प्राप्तिकर चौकशीत दोषी आढळलो किंवा कंत्राटदाराकडून पैसे घेऊन मुलांचे विवाह केल्याचे सिद्ध झाल्यास मंत्रिपदाचाच राजीनामा नाही, तर राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मंगळवारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कान टोचल्यावरही दोन विवाह एकत्र करून खर्च वाचविल्याचे प्रतिपादन जाधव यांनी केले. मात्र विवाहासाठी किती खर्च झाला आणि नुसत्या माफीऐवजी प्रायश्चित्त म्हणून दुष्काळग्रस्तांसाठी देणगी देणार का, या प्रश्नांची उत्तरे त्यांनी टाळली.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना जाधव यांनी आपल्या पुत्र व कन्येचा विवाह शाही थाटात चिपळूणमध्ये केल्याने पवार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जाधव यांनी पवार यांची आणि राज्याची माफीही मागितली होती. पण या विवाहाचा खर्च शहा या कंत्राटदाराने केला, असे आरोप झाल्याने जाधव यांनी त्याचा इन्कार केला आहे. शहा हे केटिरग कंत्राटदार असून त्यांना आपण धान्य व अन्य सामान दिले आणि त्यांनी व्यवस्थापनाचे काम केले, असे सांगून जाधव म्हणाले, कोणत्याही कंत्राटदाराने विवाहाचा खर्च केलेला नाही.
सांपत्तिक स्थिती चांगली असलेल्या तीन कुटुंबांनी एकत्र येऊन हा खर्च केला आहे. आमचे एकत्र कुटुंब आहे. प्रेम असलेल्या हजारो लोकांनी विवाहाला गर्दी केली. मी केवळ १५ हजार पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

Story img Loader