मंदिरासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत शिवसेनेने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीचा विडा उचलून कामास लागणे यात लाज वाटावी असे काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ती हिंमत व धमक नक्कीच आहे. राममंदिर उभारणीचे कार्य हाती घेताच त्यांच्या अफाट लोकप्रियतेस आणखीनच चार चांद लागतील. या देशात फक्त अल्पसंख्याक समाजाचेच चोचले पुरवले जातात असे नाही तर बहुसंख्य हिंदू समाजाचाही आवाज ऐकला जातो हे दाखवून देण्यासाठी राममंदिर उभे राहायला हवे, असे सेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तील आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी हे जगात लोकप्रिय आहेत. कारण स्वदेशातील बहुसंख्य हिंदू समाजाने त्यांना नेतृत्व बहाल केले आहे. संपूर्ण बहुमताचे २८० खासदारांचे सरकार त्यांच्या हाताशी आहे. म्हणूनच सरसंघचालकांच्या राममंदिराच्या मागणीचे महत्त्व जास्त असल्याचे या लेखातून सांगण्यात आले आहे.
‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ३८० खासदार आल्यावर राममंदिर उभारण्याचं म्हटलं होतं, पण फक्त दोन खासदार असताना भाजपने अयोध्येत रणकंदन केलं. बाबर हा येथील मुसलमानांचा कोणी लागत नाही, तसा सरकारचाही कोणी लागत नाही. हा श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धेच्या बाबतीत न्यायालयाला निवाडा करता येणार नाही.’ अशी भूमिकाही शिवसेनेकडून घेण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिर माझ्या हयातीतच मंदिर तयार होईल, असे विधान केले होते. ते कसे आणि केव्हा तयार होईल, हे सांगू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आपल्या भाषणात त्यांनी राम मंदिराचा स्पष्टपणे उल्लेख केला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा