सकाळी एक बोलायचे आणि संध्याकाळी सेटलमेंट करायची, असा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप विरोधी पक्षनते एकनाथ खडसे यांच्या चांगलात जिव्हारी लागला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून खडसे यांनी मी सेटलमेंट केली असती तर कोहिनूर मिल माझ्या नावार झाली असती, चार-दोन परदेशी गाडय़ा माझ्याकडे आल्या असत्या, अशा शब्दात राज यांच्यावर पलटवार केला.
शिवसनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी राज ठाकरे विरोधी पक्षनेत्याला बदनाम करीत आहेत, अशी टीका करतानाच आता पाठित खंजीर कुणी खुपसला ते बघा, अशा कानपिचक्याही त्यांनी भाजप नेत्यांना दिल्या.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या बैठकीवर मनसेने बहिष्कार टाकला आणि आपण स्वंतत्र असल्याचे दाखून दिले. तर त्याचवेळी राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे सेटलमेंट करीत असल्याचा आरोप करुन राजकीय गोटात खळबळ उडवून दिली. सोमवारी खडसे यांनी विधानभवनात प्रसार माध्यमांशी बोलताना राज यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. मी सेटलमेंट केली असती तर कोहिनूर मिलची जागा मीच घेतली असती, एसआरएचे चार-दोन प्लाट मिळविले असते, पन्नास-शंभर कोटींचा मालक झालो असतो, असा पलटवार त्यांनी राजवर केला.
सेटलमेंट कोण करते हे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना विचारा, असे सांगत पैसे घेतल्याशिवाय तिकिट मिळत नाही आणि दोन पेग मारल्याशिवाय आमचे इंजिन स्टार्ट होत नाही, हा आरोप जाधवांचा आहे, माझा नाही, असा टोलाही त्यांनी राज यांना हाणला. मनसेच्या आमदारांनी पुरावे देऊन माझ्यावरील आरोप सिद्ध करुन दाखवावेत, असे खुले आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिले. सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन विरोधकांना कमजोर करण्याचा मनसेचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी युती सरकारच्या काळात यांच्याकडेच जलसंपदा खाते होते, नागपुरात कुठे व कुणाबरोबर बैठका झाल्या हे सारे आपणास माहित आहे, असे खडसे यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
सेनेच्या भाजपला कानपिचक्या
राज ठाकरे यांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या एकनाथ खडसे यांची शिवेसनेचे गटनते सुभाष देसाई यांनी बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला. राज यांनी असे बिनबुडाचे आरोप करुन विरोधी पक्ष नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा त्यांनी दिला. परंतु त्याचबरोबर पाठित खंजीर कुपसणारे कोण आहेत ते बघा अशा कानपिचक्याही त्यांनी भाजपला दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा