मुंबई : परळ येथील मोक्याच्या जागेवरील दामोदर नाट्यगृहाच्या पाडकामास स्थगिती दिलेली असतानाही आचारसंहितेच्या आडून नाट्यगृह पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचा निषेध करत नाट्यगृहाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर कलाकारांसह उपोषणाला बसण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दामोदर नाट्यगृह जमीनदोस्त होऊ नये, गिरणगावातील ही ऐतिहासिक वास्तू जपली जावी यासाठी गेले तीन-चार महिन्यांपासून सामोपचाराने प्रयत्न सुरू होते. विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नाट्यगृहाचे पाडकाम स्थगित करण्याची सूचना दिलेली असताना त्याला न जुमानता दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने नाट्यगृह पाडण्यास सुरुवात केली आहे. त्याच निषेध करण्यासाठी सहकारी मनोरंजन मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत, मराठी नाट्यनिर्माते आणि कलाकार यांनी एकत्र येऊन माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दामोदर नाट्यगृहाचा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने नाट्यकर्मींची मातृसंस्था म्हणून नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला असल्याचे दामले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम, जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

दामोदर नाट्यगृहाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या सोशल सर्व्हिस लीगने नाट्यगृह पाडण्यास सुरुवात केलीच आहे. त्यामुळे त्यांनी शाळा आणि नाट्यगृह दोन्हींचे बांधकाम एकाचवेळी सुरू करून पूर्णत्वास न्यावे, नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच साडेसातशे आसनांचे असावे, नाट्यगृह तळमजल्यावरच असावे, या बांधकामासाठी मिळणाऱ्या वाढीव चटईक्षेत्राचा उपयोग दोनशे आसनांचे आणखी एक छोटेखानी नाट्यगृह बांधण्यासाठी करावा, या नाट्यगृहातील सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय आणि तालमीची जागा त्यांना देण्यात यावी, नव्याने नाट्यगृह बांधल्यानंतर त्याची भाडेवाढ करू नये तसेच या नाट्यगृहाचे काम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशा मागण्या प्रशांत दामले यांनी दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनापुढे ठेवल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन हवे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मुंबई : अनधिकृत फलक हटवण्यास सुरुवात, महानगरपालिकेकडून मध्य व पश्चिम रेल्वेला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठकीचे नियोजन

दामोदर नाट्यगृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक आयोजित करावी, अशी नाट्यपरिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांना विनंती करण्यात आली आहे. सोशल सर्व्हिस लीग आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांना एकत्र आणून या बैठकीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दामले यांनी सांगितले. तसे झाले नाही तर नाट्यवर्तुळातील कलाकारांबरोबर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांनीही दामले यांनी जाहीर केलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला. सोशल सर्व्हिस लीगने शाळा आणि नाट्यगृहाचे आरक्षणही बदलून घेतले असल्याने त्यात काही करता येणे शक्य नाही. मात्र शाळा आणि नाट्यगृह दोन्ही एकाच वेळेत बांधून पूर्ण होणे गरजेचे आहे. आणि तसे लेखी आश्वासन सोशल सर्व्हिस लीगकडून मिळालेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the issue of damodar theater is not resolved will go on fast with actors warning by prashant damle mumbai print news ssb