मुंबई : शिवसेनेसोबत जे नाहीत त्यांना विरोधक समजून आपल्याला त्यांच्याशी लढायचे आहे आणि जिंकायचे आहे, असा निर्धार व्यक्त करत बंडखोर आमदार आपल्याकडे परत आल्यास त्यांना शिवसेनेत घेऊया, असे विधान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक शिवसेनेने घेतली. त्यात आदित्य ठाकरे बोलत होते. आपल्याला केवळ शरीराने शिवसेनेत असलेले व मनाने बंडखोरांसोबत असलेले लोक नको आहेत. शिवसेना हाच विचार असलेले लोकच हवे आहेत. आयपीएलमधील लिलावाप्रमाणे किमतीची बोली लागलेले मूल्यवान आपल्याला नको आहेत, तर कोणत्याही किमतीत विकले जाणार नाहीत, असे अनमोल शिवसैनिक आपल्याला हवे आहेत, अशा शब्दांत आदित्य यांनी बंडखोरांच्या वृत्तीवर टीका केली. आता बंड करणारे आमदार शिवसेनेसोबत असते तर त्यांनी नाराजी मुंबईत प्रत्यक्ष भेटून सांगितली असती. पण ते शिवसेनेसोबत नव्हतेच. त्यामुळेच ते मुंबईबाहेर जाऊन बोलत आहेत. जे शिवसेनेसोबत नाहीत ते आपले विरोधक असून त्यांच्याशी आपल्याला लढायचे आहे व जिंकायचे आहे, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.