मुंबई : बोरिवली पश्चिम येथील अय्यप्पा मंदिर मार्गाच्या काँक्रिट कामात झाडे बाधित होत असून ही झाडे वाचवण्यासाठी रस्त्याचे संरेखन सुधारित करावे आणि झाडे वाचवावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभीजीत बांगर यांनी दिले. रस्ते कामाची गती वाढवताना गुणवत्तेचा त्याच्याशी योग्य ताळमेळ साधावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. याअंतर्गत पश्चिम उपनगरातील रस्ते काँक्रीटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये, सांताक्रूझ पूर्व येथील अग्रसेन महाराज चौक, जोगेश्वरी पूर्व येथील हनुमान नगर, नटवर नगर, गोरेगाव पश्चिम येथील पवनबाग मार्ग आणि बोरिवली पश्चिम येथील अय्यप्पा मंदिर मार्ग आदी कामांचा समावेश होता. या पाहणीच्या वेळी प्रभागनिहाय सुरू असलेल्या काँक्रीट रस्ते कामांचा आढावा घेत बांगर यांनी ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणारे काँक्रीटचे रस्ते आणि चौक ते चौक पूर्ण होऊ शकणारे रस्ते यांची सविस्तर माहिती घेतली.

बोरिवली पश्चिम येथील अय्यप्पा मंदिर मार्ग येथील एल.आय.सी. वसाहतीतील रस्ते मुंबई महानगरपालिकेकडे अलिकडेच हस्तांतरित झाले आहेत. या रस्त्याच्या रूंदीकरणासह काँक्रीटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची पाहणी करताना काही झाडे रस्तेकामात बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. रस्ते कामात झाडे बाधित होत असल्यास रस्त्याचे संरेखन (Alignment) सुधारित करावे आणि झाडे वाचवावीत, झाडांना हानी पोहोचणार नाही याची काळजी प्राधान्याने घ्यावी, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले.

पश्चिम उपनगरांत १५ एप्रिल रोजी एकाच दिवशी १०१ रस्त्यांच्या कामात मिळून तब्बल ३ हजार ११६ घनमीटर काँक्रीट टाकण्यात आले. त्याचा आढावा घेत बांगर म्हणाले की, रस्ते कामांची गती वाढली आहे, हे यातून सिद्ध होत आहे. कामांची गती वाढवताना कामांच्या गुणवत्तेशी वेगाचा योग्य ताळमेळ साधावा. दुरुस्तीसाठी हाती घेण्यात न आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावावीत. सुरूवातीपासून शेवटपर्यंतची (एंड टू एंड) कामे नियंत्रणात असावीत. दैनंदिन अहवाल तयार करावा, अशा सूचना बांगर यांनी केल्या.

नवीन आणि जुने काँक्रीट रस्ते नियोजितपणे एकमेकांना जोडावेत. जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करावी. राडारोडा, बांधकाम साहित्यामुळे या वाहिन्या तुंबता कामा नयेत याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांना तडे/भेगा पडता कामा नये, त्यादृष्टीने योग्य जोडावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले. रस्ते कामांसाठी काही ठिकाणी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना बांगर यांनी संबंधितांना केल्या.