आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला बरोबर घेतल्याशिवाय शिवसेना-भाजपला सत्ता मिळणार नाही, आम्हाला विसराल तर निवडणूक हराल, असा निर्वाणीचा इशारा या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी युतीला दिला. आरपीआयला फरपटत घेऊन जाण्याचा प्रयत्नही करू नये आणि एक महिन्याच्या आत जागावाटपाची चर्चा सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले.  
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी मुंबईतील आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे शिबीर पार पडले. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आठवले यांनी शिवसेना-भाजपच्या थंडय़ा प्रतिसादाबद्दल निर्वाणीचीच भाषा वापरली. आरपीआयने मोठी जोखीम स्वीकारून शिवसेना-भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. महायुतीतील जागावाटपाची चर्चा सुरू करावी, असे आपण गेली अनेक महिने सेना-भाजपला आवाहन करीत आहे. परंतु दोन्ही पक्षांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. महायुतीच्या वाटचालीसाठी ही चांगली गोष्ट नाही. शेवटच्या क्षणी आम्हाला फरपटत नेऊ, अशा भ्रमात कुणी राहू नये. आरपीआय सोबत असल्याशिवाय सेना-भाजपला सत्ता मिळणार नाही. आम्हाला विसराल तर निवडणूक हराल आणि पुन्हा विरोधी बाकावरच बसाल, असा इशाराच त्यांनी सेना-भाजप नेतृत्वाला
दिला. मुंबईतील दलित समाजाचा प्रभाव असणारा लोकसभेचा एक व  विधानसभेचे पाच-सहा मतदारसंघ आरपीआयला मिळाले पाहिजेत, असे आठवले म्हणाले. दक्षिण-मध्य मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघात दलितांची मतेही निर्णायक आहे. त्यामुळे या जागेसाठी आरपीआयचा आग्रह राहणारच, असे त्यांनी सांगितले. १९९५ला जेव्हा युतीची सत्ता आली होती, त्या वेळी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना २० टक्के सत्तेत सहभाग देण्यात आला होता, त्याच सूत्रानुसार आता सत्ता आल्यानंतर सेना-भाजपकडून आरपीआयला २० टक्के सत्तेत सहभाग मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. महिनाभरात जागावाटपाची चर्चा सुरू करावी, असे पुन्हा एकदा आवाहन त्यांनी सेना-भाजपला केले.

Story img Loader