लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अखेरची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. असे असताना लोकार्पण होण्याआधीच इगतपुरी – आमणे महामार्गावरून वाहने धावू लागली आहेत. यामुळे अपघातांची भितीही व्यक्त होत असून अनधिकृत वाहनांना रोखण्याचे आव्हानही एमएसआरडीसीसमोर उभे ठाकले आहे.

चारचाकीसह ट्रकही धावतात

एमएसआरडीसीच्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर – इगतपुरी महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. तर इगतपुरी – आमणे या शेवटच्या ७६ किमी लांबीच्या महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या अंतिम कामे सुरू असून ही कामे १५-२० दिवसात पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. पण हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याआधीच इगपुरी – आमणे महामार्गावरून, महामार्गातील पाच बोगद्यांतून वाहने धावू लागली आहेत.

या महामार्गाचा आसपासच्या गावातील वाहनचालकांपासून ते मुंबईतून, इतर ठिकाणाहून येणाऱ्या वाहनचालकांकडून सर्रास वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चारचाकी वाहने आणि ट्रकही अनधिकृतपणे महामार्गावरून जात आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला नसताना वाहने धावत असल्याने अपघातांची भिती निर्माण झाली आहे. तर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी

इगतपुरी – आमणे महामार्गावर अनधिकृतपणे वाहने धावत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अखेर आता एमएसआरडीसीला जाग आली आहे. एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे. स्थानिक मंडळी जबरदस्तीने, सुरक्षा रक्षकांवर अरेरावी करत महामार्गांवरून प्रवास करत आहेत. याची गंभीर दखल घेत महामार्ग पूर्णत: वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तर वाहनांविरोधात कारवाई करण्याचेही निर्देश दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पाचपैकी सर्वात मोठ्या बोगद्याला प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार आता बंद करण्यात आले आहे. मात्र उर्वरित चार छोट्या बोगद्यांना प्रवेशद्वार नाही. त्यामुळे या बोगद्यातून आणि उर्वरित महामार्गावरून स्थानिकांच्या वाहनांसह इतर वाहनांची वर्दळ सुरूच राहण्याची शक्यता आहे. या वाहनांना रोखणे अवघड असल्याचे एमएसआरडीसीतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता इगतपुरी – आमणे टप्प्यात अनधिकृतपणे धावणाऱ्या वाहनांना एमएसआरडीसी कसे रोखणार असा प्रश्न आहे.