शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कॅमेरे व सुरक्षा उपाययोजनेवरील खर्चाबाबत खातरजमा न करता विकृत बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ‘ते’ पाच लाख रुपये द्यावेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले. शिवसेनेच्या दक्षिण विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेविरोधी लिखाण करणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे म्हणत ते नेहमीप्रमाणे पत्रकारांवर घसरले.
 शिवसेनाप्रमुखांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. तरीही सुरक्षेवरील पाच लाख रुपयांच्या खर्चाबाबत वाद निर्माण करून बातम्या देण्यात आल्या. शिवसेनेने पालिकेला ही रक्कम दिली. मात्र, हा पालिकेचा खर्च असल्याने पालिकेने ती परत केली. त्यामुळे आता या रकमेतून चुकीच्या बातम्या देणाऱ्यांना पुरस्कार द्यावा, असे ते ठाकरे शैलीत म्हणाले.

Story img Loader