मधु कांबळे
मुंबई : नवी मुंबई-खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करताना, राज्य सरकारने २९ मार्चला जाहीर केलेल्या उष्मालाट कृती आराखडय़ाकडे आयोजक असलेल्या शासकीय यंत्रणांचेच दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. उष्मालाटेचा विचार करून, दुपारी २ ते ४ या दरम्यान मोर्चे, निदर्शने, अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला परवानागी द्यायची की नाही, त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृती आराखडय़ात देण्यात आल्या आहेत.
या वर्षी देशातच २ अंश सेल्सियसने उष्णाता जास्त वाढणार आहे, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी २ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांच्या आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता व स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने उष्णतेची लाट कृती आराखडा २०२२-२३ जाहीर केला आहे. १ मार्च ते १५ जून या कालावधीसाठी हा आराखडा असून, उष्मालाटेमुळे होणाऱ्या परिणामाचा मुकाबला करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना काय काय करायच्या याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचनांचा समावेश त्यात करण्यात आला आहे.
खारघर येथे १६ एप्रिलला आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळय़ावेळी उष्माघाताने १४ जणांचा बळी गेला, त्या आधी २९ मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या सहीने हा कृती आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. कृती आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री, वित्त मंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आरोग्य मंत्री हे पदसिद्ध सदस्य असून राज्याचे मुख्य सचिव मुख्य प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जिल्हास्तरावर कृती आराखडय़ाच्या अंमलबजावणी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांत एप्रिल ते मे महिन्यात उष्णतेच्या झळा तीव्र स्वरूपाच्या दिसून येतात, असे कृती आराखडय़ात म्हटले आहे. त्याचा विचार करून या वर्षी शासकीय रुग्णालयांतील एकूण १३ हजार ९४४ खाटांपैकी १६४५ खाटा उष्मालाट बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सूचना काय?
तापमानाच्या निकषानुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात ३० अंश सेल्सियस, किनारी पट्टय़ात ३७ अंश सेल्सियस व समतल भागात ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद होणे किंवा या भागात सलग दोन दिवस हंगामातील सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात वाढ होणे, यापैकी कोणतीही एक नोंद आढळस्यास या भागात उष्णतेची लाट आहे असे समजून, त्यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. उष्मा लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आलेली असल्यास दुपारी दोन ते चार या कालावधीत मोर्चे, प्रदर्शने, यांना परवानगी देताना वरील बाबी विचारात घ्याव्यात अशा मार्गदर्शक सूचना या कृती आराखडय़ात देण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक तत्त्वांचा विसर
नवी मुंबई : सोहळय़ात उष्माघात आणि चेंगराचेंगरीची शक्यता आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार वैद्यकीय सुविधाही उभारण्यात आल्या. मात्र, प्रचंड जनसमुदाय असेल तेव्हा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन याठिकाणी करण्यात आले नाही, असे स्पष्ट होत आहे. गोवारी हत्याकांडानंतर एकाच ठिकाणी जनसमुदाय असल्यास जास्तीत जास्त ‘आऊटलेट’ (बाह्यगमन मार्ग) ठेवण्याचे मार्गदर्शक तत्त्वांत निश्चित करण्यात आले होते. मात्र, खारघरमधील मैदानात सात बाह्यगमन मार्ग ठेवण्यात आले.कार्यक्रमाला येताना श्री सदस्य वेगवेगळय़ा वेळी तसेच मार्गानी आले होते. मात्र, घरी परतताना लाखोंची गर्दी एकाच वेळी एका दिशेने बाहेर पडली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे समजते.
सात तास अन्न-पाणी नाही
दुर्घटनेत बळी गेलेल्या १४ पैकी १२ मृतांच्या पोटात सात ते आठ तास अन्न-पाणी नव्हते, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा शवविच्छेदन अहवाल संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे.
संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाची तक्रार
मुंबई: संजय राऊत यांनी खारघर येथील दुर्घटनेबाबत खोटी माहिती पसरवल्याची तक्रार शिंदे गटाकडून बुधवारी मरिन ड्राइव्ह पोलिसांकडे करण्यात आली. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट व किरण पावसकर यांनी बुधवारी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिला. खारघर दुर्घटनेत ५० ते ७५ मृत्यू झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. हा मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा आरोप राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. दुर्घटनेत ५० मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी आम्ही मरिन ड्राइव्ह पोलिसांकडे राऊत यांच्या विरोधात तक्रार केल्याचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती, अहवालासाठी एका महिन्याची मुदत
मुंबई : खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळय़ादरम्यान झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती नेमण्यातआली असून, त्यांना महिनाभरात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्याचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या उपस्थित रविवारी खारघर येथे पार पडला. त्यात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला, तर शेकडो श्रीसेवक जखमी झाले. सरकारच्या बेफिकीरीमुळेच १४ बळी गेल्याचा आरोप केला जात आहे. उष्माघातामुळे हे मृत्यू झाल्याचा दावा सरकार करीत असले तरी चेंगराचेंरीमुळेही काहींचा मृत्यू झाल्याची तसेच सरकार मृतांचा आकडा लवपत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या संपूर्ण दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.