लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मुंबईच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण नोकऱ्यांच्या संख्येत १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे तर वेतनाचे प्रमाणही पाच टक्क्यांनी वाढले आहे. नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वार्षिक वेतन हे ३४ लाख असून, यातील १० टक्के विद्यार्थ्यांना ४७ लाख ५० हजार इतके वार्षिक वेतन मिळाले आहे. यंदा मायक्रोसॉफ्टने दोन विद्यार्थ्यांना सर्वाधिक ५४ लाखांचे वेतन जाहीर केले असून, गतवर्षीच्या तुलनेत हे वेतन अधिक आहे.
२०२५ चा प्लेसमेंट अहवाल बुधवारी जाहीर केला. या अहवालानुसार यंदा सर्व ४८० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. नॅशनल इन्स्टिट्युट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग या संस्थेचे आयआयएम मुंबईमध्ये दोन वर्षांपूर्वी रुपांतर करण्यात आले. त्यानंतर सलग दोन वर्षे आयआयएम मुंबईकडून १०० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंटद्वारे नोकऱ्या देण्यात येत आहेत. संस्थेने यंदाचा अहवाल बुधवारी जाहीर केला.
गतवर्षी १८० कंपन्यांनी आयआयएम मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. यंदा त्यात वाढ होऊन ही संख्या १९८ एवढी झाली. यंदा ४८० विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी झाले. त्यात ३७७ विद्यार्थी आणि १०३ विद्यार्थिनींचा सहभाग होता. या ४८० पैकी सर्वोत्कृष्ट १० टक्के विद्यार्थ्यांना सरासरी ४७.५ लाख रुपयांचे वेतन मिळाले. त्यानंतरच्या २० टक्के विद्यार्थ्यांना वार्षिक ४१ लाख २० हजार रुपये वेतन मिळाले. तसेच २४० विद्यार्थ्यांना किमान ३४ लाख १० हजार रुपयांचे सरासरी पॅकेज मिळाले. मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक ५४ लाख रुपये प्रतिवर्ष इतके वेतन दोन विद्यार्थ्यांना दिले. तर सर्वात कमी वेतन १८ लाख रुपये इतके देण्यात आले आहे. तसेच दुबईतील लँडमार्क या कंपनीने दोन विद्यार्थ्यांना वार्षिक ३५ लाख रुपये वेतन देत परदेशातील नोकरी देऊ केली आहे.
औषधनिर्माण आणि आरोग्य क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या
यंदा सर्वाधिक नोकऱ्या या फार्मा आणि हेल्थकेअर या क्षेत्रामध्ये देण्यात आल्या. या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांच्या संख्येमध्ये १३० टक्क्यांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे रिटेल आणि ई कॉमर्समध्ये ६५ विद्यार्थी, ऑनलाईन शॉपिंग या क्षेत्रामधील नोकऱ्यांच्या संख्येत ४७.७३ टक्क्यांनी वाढ झाली. तसेच कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये २८.९२ टक्क्यांनी वाढ झाली. तसेच बँकिंग आणि फायनान्स इंडस्ट्रीत ५० विद्यार्थ्यांनी नोकऱ्या मिळवल्या. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा ॲनालिटिक्स या क्षेत्रातही नोकरीच्या चांगल्या संधी मिळाल्या.
ॲक्सेंचर कंपनीने दिल्या सर्वाधिक नोकऱ्या
आयआयएम मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये यंदा ॲक्सेंचरने सर्वाधिक ४१ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना ४५ लाख ३७ हजार रुपये इतके वार्षिक वेतन कंपनीने दिले आहे. त्याचप्रमाणे पीडब्ल्यूसी इंडियाने १८ विद्यार्थी, ब्लिंकइटने १४ विद्यार्थी आणि पीडब्ल्यूसी युएस ॲडव्हायसरीने १० विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत.
या कंपन्यांचा सहभाग
ॲक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट, व्होडाफोन, आयडिया, प्राक्सिस ग्लोबल अलायन्स, वर्कबे, अल्वारेझ अँड मार्शल, झेडएस, ब्लिंकइट, ओएनजीसी, इत्यादी