विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी याकरिता देशभरात सगळीकडे विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाइन आणि केंद्रीभूत पद्धतीने करण्याचा आग्रह होत असतानाच राज्यातील व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांचे (आयटीआय) प्रवेश संस्थास्तरावर (ऑफलाइन) करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. आयटीआयमधील प्रशिक्षित विद्यार्थ्यांना उद्योगांकडून असलेली मागणी आणि विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमांकडे असलेला वाढता ओढा यामुळे खासगी संस्थांच्या दबाबामुळे संचालनालयाला ही पद्धती स्वीकारणे भाग पाडले जात असले तरी विद्यार्थ्यांची मात्र यामुळे ससेहोलपट होणार आहे.
ऑफलाइन प्रक्रियेत अनेकदा खासगी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता डावलून प्रवेश केले जातात. तर कॅपिटेशन फी अॅक्टचे उल्लंघन करून पालकांकडून वाट्टेल तसे डोनेशनही उकळले जाते. याशिवाय राज्यभरातील विविध संस्थांमध्ये प्रवेश अर्ज भरणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता संस्थांचा विचार करताना मर्यादा येतात. म्हणून गेल्या तीन वर्षांपासून ‘व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालया’तर्फे आयटीआयचे प्रवेश ऑनलाइन केले जात आहेत. संचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश-प्रक्रियेचे मॉडेल इतर राज्यांनीही स्वीकारले आहे. परंतु, आता पुन्हा एकदा खासगी संस्थाचालकांच्या दबावामुळे जुनी व मागास प्रवेश प्रक्रिया संचालनालयाला स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे.
‘उद्योगांकडून आयटीआयच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना असलेली मागणी वाढते आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी असलेल्या चुरशीमुळे गेल्या काही वर्षांत या अभ्याक्रमांचा कटऑफही वधारला आहे. प्रवेशांसाठी चुरस असली की ऑनलाइन प्रवेशांचा आग्रह धरला जातो. गेली तीन वर्षे संचालनालय अत्यंत अत्यंत सुलभपणे प्रवेश प्रक्रिया पार पडते आहे. तरीही अमरावती आणि नागपूरमधील काही खासगी संस्थांकडून वारंवार प्रवेश प्रक्रिया संस्थास्तरावर राबविण्याचा आग्रह धरला जात आहे,’ असे सूत्रांनी सांगितले. चांगल्या गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा सरकारी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे ओढा असतो. ऑनलाइनमध्ये सरकारी संस्थांनंतर विद्यार्थी खासगी संस्थांना पसंतीक्रम देतात. गुणवत्तेनुसार प्रवेश होत असल्याने आमच्याकडे कमी गुणवत्ताधारक विद्यार्थी येतात, असा खासगी संस्थांचा युक्तिवाद आहे.
२०१४मध्ये १.२ लाख विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशाकरिता अर्ज केले होते. तर २०१५मध्ये हीच संख्या १.४५वर गेली होती. प्रवेश परीक्षा झाल्यानंतर संचालनालय विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरावर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविते. गेल्या वर्षी खासगी संस्था या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. यात एका विद्यार्थ्यांला बसल्या जागी संगणकावरून तब्बल ९०० आयटीआयचा पसंतीक्रम देता येतो. परंतु, ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे पर्याय सीमित होऊन जातील.
आयटीआयच्या जागा आणि झालेले प्रवेश
वर्ष जागा प्रवेश
२०१३ ९७५५५ ८२०३२
२०१४ ९२७२१ ७९८८६
२०१५ ९२४६४ ८०५०८