मुंबई : कानात टिकटिक, अन्य ध्वनींची खुसपूस वा चक्क शिट्टीच्या आवाजाने त्रस्त असलेले रुग्णांमध्ये ‘टिनिटस’ची समस्या असते. या व्याधीने ग्रस्त असलेल्यांमध्ये निद्रानाश, नैराश्य, चिडचिड वाढीस लागते. मात्र, या समस्येवर मात करण्यासाठी ‘आयआयटी मुंबई’ने रुग्णांना सहज हाताळता येईल, असे उपकरण आणि त्यासाठी मोबाइल आधारित सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
‘जामा न्यूरोलॉजी २०२२’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या माहितीनुसार, जगात सुमारे ७४ कोटींहून अधिक प्रौढांना ‘टिनिटस’चा सामना करावा लागत आहे. त्यापैकी १२ कोटींहून अधिक रुग्णांत ही समस्या अधिक बळावलेली आहे.
हेही वाचा >>>२०२४ आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष, तापमानात आजपर्यंत सरासरी १.५ अंश सेल्सिअसने वाढ
‘आयआयटी मुंबई’तील संशोधक प्रा. मरियम शोजाई बगिनी, नीलेशकुमार पंडित, एम. टेकच्या विद्यार्थ्यांचा एक गट, तसेच हिंदुजा रुग्णालयातील वैद्याकीय तज्ज्ञ डॉ. मिलिंद कीर्तने, डॉ. अर्पित शर्मा, डॉ. संगीता वर्ती, आणि निशिता मोहनदास यांच्या पथकाने ‘टिनिटस’चे निदान आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी नावीण्यपूर्ण संशोधन योजना, विकास आणि वैद्याकीय मूल्यमापनावर भर दिला.
या प्रकल्पाला ‘आयआयटी मुंबई’तील ‘टाटा सेंटर फॉर टेक्नोलॉजी अॅण्ड डिझाइन’ (टीसीटीडी) आणि ‘वाधवानी रिसर्च सेंटर फॉर बायोइंजिनीयरिंग’ (डब्ल्यूआरसीबी)ने निधी उपलब्ध करून दिला. ‘टिनिटस’ची लक्षणे असलेल्या रुग्णांवर या उपकरणाचा वापर केल्यानंतर त्यांच्यातील सुधारणा दिसून आली, त्यामुळे या उपकरणांमध्ये ‘टिनिटस’च्या रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होईल. टिनिटसचे उपकरण, मोबाइल आधारित सॉफ्टवेअर आणि पहिल्या क्लिनिकल चाचणीचे परिणाम इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल स्किल्सच्या डिसेंबर २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आवाजाशी निगडीत ‘टिनिटस’ग्रस्तांसाठी ‘आयआयटी मुंबई’तील संशोधक आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन सॉफ्टवेअर तयार केले आहे.
हेही वाचा >>>२ हजार कोटींचा एसटी घोटाळा
स्वदेशी उपकरण
‘आयआयटी मुंबई’ आणि हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्रित संशोधित केलेले हे स्वदेशी उपकरण बाजारात आणण्याच्या दृष्टिकोनातून ‘स्टार्ट अप’कडे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात येत आहे. स्टार्ट-अप कंपनीने क्लिनिकल चाचण्या करण्याची आणि उत्पादनाच्या व्यापारीकरणासाठी नियामक मंजुरी मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.