मुंबई : इंजेक्शनचा उल्लेखही अनेकांच्या अंगावर काटा आणणारा ठरतो. काहींमध्ये ही भीती इतकी प्रबळ असते की रुग्ण उपचार घेण्यास नकार देतात. मधुमेही रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन वारंवार घ्यावे लागत असल्याने त्यांना हा ताण अधिक असतो. मात्र आता सुई नसलेले इंजेक्शन आयआयटी मुंबईतील संशोधकांनी विकसित केले आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह-आधारित सुई-विरहित सिरिंज विकसित केली. त्या सुईमुळे शरीरात वेदनाविरहित आणि सुरक्षितपणे औषध पसरवता येते. या सिरिंजमुळे त्वचेला होणारी इजा आणि संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा आयआयटीच्या संशोधकांनी केला आहे.
आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातील प्रा. वीरेन मेनेझेस यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या गटाने सुई न टोचता शरीरात औषध सोडण्याचे तंत्र ‘शॉक सिरिंज’ वापरून विकसित केले आहे. शॉक सिरिंज नेहमीच्या बॉलपॉईंट पेनापेक्षा किंचित लांब असून २०२१ मध्ये प्रा. मेनेझेस यांच्या प्रयोगशाळेत ती विकसित करण्यात आली. जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हायसेसमध्ये त्यांचा अभ्यास प्रकाशित झाला. या अभ्यासात त्यांनी प्रयोगशाळेतील उंदरांवर शॉक सिरिंजने दिलेले औषध आणि नेहमीच्या इंजेक्शनने दिलेले औषध याच्या परिमाणकारकतेची तुलना केली.
हेही वाचा >>> वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
नेहमीचे सुईसह असलेले इंजेक्शन जोरात टोचल्यास त्वचेवर किंवा त्वचेखालील उतींवर आघात होऊ शकतो. इंजेक्शनमुळे शरीरातील उतींचे कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी शॉक सिरिंज महत्त्वपूर्ण ठरते. शॉक सिरिंजमध्ये आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे उच्च ऊर्जा असलेले आघात तरंग वापरून त्वचेला छिद्र पाडले जाते. सिरिंजच्या तोंडाच्या छिद्राची रुंदी फक्त १२५ मायक्रोमीटर म्हणजे मानवी केसाच्या जाडीएवढी ठेवली आहे. तोंड लहान असल्याने इंजेक्शन आत जाताना त्रास होत नसल्याचे पीएचडीच्या विद्यार्थिनी आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका प्रियांका हंकारे यांनी सांगितले.
संशोधकांनी तीन वेगवेगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून तीन औषधे उंदरांमध्ये टोचली. हाय-परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी पद्धत वापरून औषधाचे शरीरातील वितरण आणि शोषण मोजण्याकरता संशोधकांनी रक्तातील आणि ऊतींमधील औषधांची पातळी मोजली. तसेच भूलीचे औषध उंदरांच्या त्वचेत टोचले, तेव्हा शॉक सिरिंजने तोच परिणाम साधला जो सुई टोचण्याने झाला. दोन्ही प्रकारात, भुलीचा परिणाम तीन ते पाच मिनिटांनी सुरु झाला आणि २० ते ३० मिनिटे टिकला. यावरून शॉक सिरिंज अनुरूप असल्याचे सिद्ध झाले. बुरशीविरोधी औषधांचे वितरण करताना शॉक सिरिंज ही नेहमीच्या सुई असलेल्या सिरिंजपेक्षा जास्त परिणामकारक ठरली. शॉक सिरिंजने मधुमेही उंदरांना इन्शुलिन दिल्यावर नेहमीच्या सुईच्या तुलनेत रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे खाली गेल्याची आणि जास्त काळासाठी कमी राहिल्याचे संशोधकांना आढळून आले. सुईपेक्षा शॉक सिरिंजने उंदरांच्या त्वचेला झालेले नुकसान कमी होते तसेच शॉक सिरिंजच्या वापरामुळे होणारा दाह कमी असल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>> राज्यातील विद्यापीठांतील भरती एमपीएससीऐवजी विद्यापीठांतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
शॉक सिरिंजद्वारे इंजेक्शन देण्याची प्रक्रिया
शॉक सिरिंजमध्ये एक सूक्ष्म आघात नलिका असून त्याचे तीन भाग आहेत. ड्राइवर, ड्राईव्ह करायचा भाग आणि औषधधारक भाग. हे तिन्ही एकत्रितपणे काम करून आघात तरंगाच्या माध्यमातून अतिसूक्ष्म फवारा तयार करतात. हा फवारा शरीरात औषध पसरवतो. या फवाऱ्याचा वेग विमानाच्या उड्डाणावेळी असलेल्या वेगाच्या दुप्पट असतो. हा द्रवरूपी औषधाचा फवारा सिरिंजच्या तोंडातून बाहेर पडून त्वचेला भेदून शरीरात जातो. ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळायच्या आत अत्यंत वेगाने आणि तरी सौम्यपणे होते.
शॉक इंजेक्शनचे अन्य फायदे
केवळ वेदनाविरहित इंजेक्शनपेक्षा शॉक सिरिंजचे इतरही फायदे आहेत. लहान मुले आणि मोठ्यांच्या लसीकरण मोहिमा लवकर आणि जास्त परिणामकारक होऊ शकतील. सुई चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने किंवा अयोग्य विल्हेवाट लावल्यामुळे होऊ शकणारे रक्तजन्य रोगही टाळता येऊ शकतील, असे हंकारे यांनी सांगितले.
शॉक सिरिंजचे भविष्य जरी उज्वल असले तरी, वैद्यकीय क्षेत्रात प्रत्यक्ष वापर करून इंजेक्शन देण्याची क्षमता ही अनेक घटकांवर अवलंबून आहे. मनुष्यांमध्ये वापरासाठी कल्पकता, नियामक मान्यता, परवडण्याजोगी किंमत आणि उपकरणाची उपलब्धता महत्त्वाची आहे. – प्रियांका हंकारे, अभ्यास प्रमुख, आयआयटी मुंबई</p>