Researchers at IIT Bombay using robots to understand how animals find their way back home सायंकाळी चरायला गेलेली गुरे गोठ्यात येतात, मांजर लांब सोडले तरी ते मालकाच्या घरी परतते, कबुतरांच्या शेकडो किलोमिटरच्या शर्यती लावल्या जातात. पाळलेले बहुतेक सर्व पशू-पक्षी रस्ता शोधून घरी परततात. त्यांना रस्ता कसा लक्षात राहतो, ते मार्ग कसा शोधतात या कोडे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या (आयआयटी मुंबई) संशोधकांनी उकलले आहे. रस्ता शोधून मार्गक्रमण करताना प्राण्यांना मार्गदर्शक संकेत पुरेसा नसून, त्या प्रक्रियेमध्ये बदलती भौगोलिक परिस्थिती, इतरांशी व्यवहार, आणि पर्यावरणातील इतर घटकांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्राण्यांच्या घरी परतण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमागील रहस्य उलगडण्यासाठी आयआयटी मुंबईतील संशोधकांनी क्रियाशील व सजीव गोष्टींच्या भौतिक क्रियांचा अभ्यास केला. त्यात सजीवांच्या हालचालींची नक्कल करण्यासाठी काही सेंटीमीटर आकाराचे स्वचलित यंत्रमानव तयार करण्यात आले. त्यात प्राण्यांमध्ये दिसून येणारी अन्नाचा शोध घेण्याची प्रवृत्ती आणि मूळ स्थानी अचूक परतण्याची हातोटी यांचे अनुकरण करणारा एक यंत्रमानव संशोधकांनी विकसित केला. प्राणी अन्नाचा शोध घेताना स्वैरपणे संचार करतात. तशा सूचना यंत्रमानवाला देण्यात आल्या. यंत्रमानवाच्या सतत फिरण्याच्या (रोटेशनल डिफ्युजन) प्रक्रियेमुळे तो स्वत: दिशा वरचेवर बदलून त्याचा मार्ग काही प्रमाणात स्वैर होत होता. मार्गदर्शक प्रकाशाचा मागोवा घेत परतीचा मार्ग शोधण्यासाठी यंत्रमानवाचे प्रोग्रामिंग केल. बदलत जाणारा प्रकाश टाकल्यानंतर यंत्रमानव मूळ स्थानी परत आला. त्यानंतर सूर्यप्रकाश किंवा पर्यावरणातले इतर काही संकेत वापरून काही प्राणी मार्ग शोधत असावेत, त्याचे अनुकरण यंत्रमानव करत असल्याचे आयआयटी मुंबईतील भौतिकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. नितीन कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा >>> आरोग्य विभागाच्या मानसिक उपक्रमांनाच ‘मानसिक आधाराची’ गरज!
परतीचा मार्ग अधिक किचकट असेल तर यंत्रमानवाला परत यायला किती वेळ लागतो याचा अभ्यास संशोधकांना करायचा होता. त्यानुसार परतीची वाट शोधताना प्राणी किती वेळा दिशेत सुधारणा करतात हे तपासण्यात आले. गती अधिक आणि वावर स्वैर असेल तर यंत्रमानवाने अधिकवेळी दिशा बदलली आणि तो काही कालावधीने स्वगृही परतला. यावरून वातावरणात कुठलाही व्यत्यय किंवा अनिश्चितता असली तरीही ठरावीक दिशा निश्चित करूनन घरी परतण्याचासाठी प्राण्यांची इंद्रिये विकसित झाली असावीत असे कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा >>> बाळाच्या नियमित लसीकरणासाठी ‘हॅलो व्हॅक्सी’; लसीकरणाची सर्व माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार
संशोधकांनी प्रत्यक्ष रोबोटवरील प्रयोगांबरोबरच प्राण्यांच्या गतीचे अनुकरण करणारे आभासी रोबोट सारखे संगणकीय पद्धत देखील वापरली. यातील निष्कर्ष एकसारखे आले. स्वगृहागमन प्रक्रियेत असलेल्या कबुतरांच्या थव्याचे मार्ग त्यांनी तपासले. त्यात संशाेधकांचे निष्कर्ष जुळलेले दिसून आले. प्रस्तावित सिध्दांताप्रमाणे वरचेवर मार्गात दुरुस्ती करून मूळस्थानी प्रभावीपणे पोहचता येत असल्याची खात्री यामुळे झाली. स्वगृही परतण्याचे प्राण्यांचे कौशल्य प्रत्यक्षात उतरवण्यात आल्याने संशोधकांना या प्रक्रियेमागचे विज्ञान समजायला मदत होणार आहे. आयआयटी मुंबईच्या या अभ्यासामुळे प्राणी मार्ग कसा शोधतात याबाबत माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर रोबोटिक्सच्या क्षेत्रात लक्षणीय तांत्रिक प्रगतीची आशा आहे. भविष्यातील अभ्यासात प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये स्थळ, काळ यानुसार होणारे बदल आणि वाटेतील अडथळे यांचा रोबोटमध्ये समावेश करायचा हेतू असल्याचे सांगत डॉ. कुमार यांनी पुढील संशोधनाची दिशा स्पष्ट केली.