मुंबई : काही वर्षांपासून उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईने (आयआयटी, मुंबई) नुकत्याच केलेल्या एका संशोधनात चुंबकाच्या सहाय्याने धमन्यांमधील रक्तप्रवाह आणि रक्तदाबाचे नियमन केल्यास जीवावर बेतणे टाळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईमधील संशोधकांनी रक्तप्रवाहाच्या पद्धतीचे अनुरूपण (सिम्युलेशन) आणि विश्लेषण करण्यासाठी संगणनात्मक संरचनेचा वापर केला. त्यांनी प्रवाहाची गती (वेग), दाब, आणि धमन्यांमधील वॉल शियर स्ट्रेस यासारख्या घटकांना विचारात घेतले. ‘वॉल शियर स्ट्रेस म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर रक्तप्रवाहाच्या दिशेने निर्माण झालेले प्रति एकक क्षेत्र बल होय.

वॉल शियर स्ट्रेस रक्तवाहिन्यांचे आरोग्य दर्शवणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. प्रमाणाबाहेर असलेल्या वॉल शियर स्ट्रेसमुळे एथेरोस्क्लेरॉसिससारखे (रक्तवाहिनीच्या भिंती जाड व कडक होणे) आजार उद््भवू शकतात. रक्तवाहिनीच्या भिंतीलगत रक्ताच्या गतीचा आणि प्रवाहितेचा वॉल शियर स्ट्रेसवर परिणाम होतो, असे आयआयटी मुंबईच्या यांत्रिकी, अभियांत्रिकी विभागातील प्रा. अभिजित कुमार यांनी सांगितले. प्रा. अभिजित कुमार यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले.

कसा केला अभ्यास

संशोधकांनी धमनीचे संख्यात्मक प्रारूप तयार केले आणि अरुंद झालेल्या धमन्यांवर चुंबकीय क्षेत्राचा काय परिणाम होतो याचा गणितीय समीकरणे वापरून अभ्यास केला. रक्तातील लोहयुक्त हिमोग्लोबिनवर चुंबकीय क्षेत्राची क्रिया होते. चुंबकीय क्षेत्राच्या दिशेप्रमाणे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. संशोधकांनी रक्ताची गती मोजली, विद्युतचुंबकीय क्षेत्राचे विश्लेषण केले आणि रक्ताचा घट्टपणा किंवा चिकटपणा व प्रवाह तपासले. संशोधकांनी वेगवेगळ्या टप्प्यातील आणि विविध आकारात अरुंद झालेल्या धमन्यांचे प्रारूप बनवले.

यामध्ये सौम्य २५ टक्के अवरोधित, मध्यम ३५ टक्के अवरोधित, आणि गंभीर/तीव्र ५० टक्के अवरोधित धमन्या होत्या. संशोधकांनी रक्त प्रवाहाला समांतर चुंबकीय क्षेत्र वापरले, तेव्हा रक्त प्रवाहाचा वेग वाढलेला आढळला. तसेच रक्त प्रवाहाला काटकोनात असलेले चुंबकीय क्षेत्र वापरले तेव्हा रक्त प्रवाहाचा वेग कमी झाला. चुंबकीय क्षेत्रामुळे सौम्य, मध्यम व तीव्र प्रमाणात अवरोधित धमन्यांमधील रक्त प्रवाह अनुक्रमे १७ टक्के, ३० टक्के आणि ६० टक्क्यांनी वाढला असे संगणकीय अनुरूपणात दिसून आले. चुंबकीय क्षेत्र रक्त प्रवाहाच्या दिशेने असेल तर तीव्र संकुचित धमनीतील अवरोधाजवळील दाब कमी होतो.

उपचारांमध्ये चुंबकाच्या प्रयोगाची शक्यता खुली

चुंबकीय क्षेत्र सर्व आकारात अवरोधित झालेल्या रक्त वाहिन्यांमधील रक्त प्रवाह आणि दाबातील चढ – उतार सुरळीत करते. प्लाक फुटण्याचा धोका कमी करते. चुंबकीय क्षेत्राचा रक्त प्रवाह, दाब आणि वॉल शियर स्ट्रेस यावर परिणाम होतो, असे अभ्यासातून निष्पन्न झाले. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि धमन्यांच्या भिंतींची हानी रोखण्यासाठी मदत होईल. चुंबकीय क्षेत्र रक्त प्रवाहात प्रभावीपणे बदल घडवून आणते आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेप्रमाणे रक्त प्रवाह जलद किंवा मंद करू शकत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या निष्कर्षानुसार हृदयरोगावरील उपचारांसाठी चुंबकाच्या प्रयोगाची शक्यता खुली झाली आहे.

अधिक संशोधनाची गरज

उच्च आणि अतिउच्च चुंबकीय क्षेत्राचे प्रायोगिक प्रारूपांमध्ये सकारात्मक आणि प्रतिकूल असे दोन्ही परिणाम दिसले आहेत. त्यामुळे रुग्ण चिकित्सेमध्ये वापर करण्यापूर्वी सुरक्षिततेचे मूल्यमापन अतिशय महत्त्वाचे आहे. उपचारातील गुंतागुंत व आव्हाने बघता, असे उपचार व्यापक स्तरावर उपलब्ध होण्यासाठी आणखी काही वर्षे लागतील. यामध्ये आणखी व्यापक संशोधन, वैद्यकीय चाचण्या आणि नियामक मान्यतांची गरज आहे. या पद्धतीची सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांची खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक मूल्यमापनाची आवश्यकता आहे. असे प्रा. कुमार यांनी सांगितले.

Story img Loader