मुंबई : भारतील रेल्वेच्या जाळ्याला देशाची रक्तवाहिनी म्हटले जाते. मात्र, भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकातील अडचणींमुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकाच्या नियोजनातील अडचणी सोडवण्यासाठी आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली आहे. लांब पल्ल्याच्या आणि आठवड्यातून एक-दोन वेळा धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक अधिक सुटसुटीत करण्यासाठी ‘समूह नियोजन’ ही संकल्पना वापरली आहे.
भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे जाळे असून, १६० वर्षांपासून वापरात आहे. तसेच, देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, दररोज धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आखणे सोपे असले तरी आठवड्यातून काही दिवस चालणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आखणे हे मोठे आव्हान असते.
रोज न धावणाऱ्या गाड्या इतर विभागातील रुळांवरून व स्थानकांतून धावतात, तेव्हा संबंधित विभागातील रोज धावणाऱ्या गाड्यांसाठी त्या अडथळा ठरतात. या समस्येवर उपाय म्हणून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी दैनिकीकरण (डेलीझिंग) ही संकल्पना विकसित केली आहे. या संशोधनामध्ये हायरार्किकल अॅग्लोमरेटिव्ह क्लस्टरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अशा गाड्यांना एका समूहात समाविष्ट केले. यामुळे त्या गाड्यांचे वेळापत्रक अधिक सुसंगत आणि नियोजनबद्ध करण्यास मदत झाली.
दररोज १३,१५० हून अधिक गाड्या धावतात
समूह नियोजनाद्वारे, समान मार्गांवर वेगवेगळ्या दिवशी धावणाऱ्या गाड्यांना एकाच वेळेत बसवता येते. यामुळे रेल्वे मार्ग अधिक कार्यक्षम होतो आणि संधी न वापरलेल्या वेळेचा उपयोग नवीन गाड्यांसाठी करता येतो. सध्या भारतीय रेल्वेमध्ये दररोज १३,१५० हून अधिक प्रवासी गाड्या धावतात. मात्र, त्यातील अनेक गाड्या आठवड्यातून काहीच दिवस धावत असल्यामुळे काही मार्गांवर गर्दी होते, तर काही ठिकाणी मार्ग वापरात नसतो. या नवीन प्रणालीच्या मदतीने अशा विसंगती टाळता येणार असून, वेळापत्रक अधिक नियोजनबद्ध करता येईल.
जीक्यूडी प्रणालीची निवड
आयआयटी मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रोफेसर मधू एन. बेलूर, इंडस्टियल इंजिनियरिंग ॲण्ड ऑपरेशन रिसर्च विभागाचे प्रा. नारायण रंगराज, विभागीय रेल्वे आणि सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिममधील तज्ज्ञांनी एकत्रित येऊन यावर संशोधन केले. त्यांनी भारतीय रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यासाठी मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांना जोडणारी ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल आणि डायगोनल्स’ (जीक्यूडी) या प्रणालीची निवड करण्यात आली.
यामध्ये हायरार्किकल अॅग्लोमरेटिव्ह क्लस्टरिंग, डेन्सिटी बेस्ड स्पेशियल क्लस्टरिंग ऑफ ॲप्लिकेशन विथ नॉईज आणि के मीन्स या सारख्या प्रसिद्ध समूहीकरण तंत्राचा वापर केला. या पद्धतीमुळे रेल्वे मार्गांवरील गर्दी व्यवस्थापित करण्यास मदत होण्याबरोबरच नवीन गाड्यांसाठी जागा निर्माण होण्याकरिता मदत झाली. भविष्यात अधिक चांगला समन्वय साधून ही प्रणाली आणखी प्रभावी केली जाऊ शकते, असे आयआयटी मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रोफेसर मधू एन. बेलूर यांनी सांगितले.
आयआयटी मुंबई आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गोल्डन क्वाड्रिलॅटरल आणि डायगोनल्स मार्गावर दैनिकीकरण प्रणाली लागू करण्यात आली आहे. भविष्यात अन्य रेल्वे मार्गांवरही या तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतीय रेल्वे अधिक जलद, कार्यक्षम आणि सुटसुटीत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.