भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक
मुंबई : मुंबईत मोठ्या संख्येने रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू असून मुंबई महानगरपालिकेने या रस्त्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) नेमणूक केली आहे. रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे (आयआयटी) आहे. यानुसार आयआयटी मुंबईच्या पथकाने दहिसर येथील रस्ते कामांची गुरुवारी मध्यरात्री पाहणी केली.
हेही वाचा >>> रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासा; आमदार ॲड. आशिष शेलार यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
महापालिकेने मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. रस्त्यांच्या कामांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, कामे चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी महापालिकेने यावेळी आयआयटीची त्रयस्थ संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर तडे पडल्याचे आढळले असून तशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयआयटीच्या पथकाने दहिसर येथे गुरुवारी मध्यरात्री कॉंक्रीटीकरणाच्या कामांची पाहणी केली. आयआयटी मुंबईच्या चमूमध्ये प्रा. सोलोमॉन यांच्यासह चार सदस्यांचा समावेश होता.
हेही वाचा >>> केईएम रुग्णालयात प्रथम वर्षाच्या डॉक्टरकडून क्ष किरण तंत्रज्ञाला मारहाण
सिमेंट कॉंक्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने विविध निकषांची या चमूने पाहणी केली. सिमेंट कॉंक्रीटचे चौकोनी तुकडे (क्यूब), रेडिमिक्स कॉंक्रिटच्या पावत्या आणि बॅचचा अहवाल यावेळी तपासण्यात आला. तसेच कॉंंक्रीटचे तापमान, स्लम्प चाचणी, फ्लेक्जूरल बीम सॅम्पल कास्टिंग आदी चाचण्याही यावेळी करण्यात आल्या. मध्यरात्री १२ पासून ते २ पर्यंत पार पडलेल्या पाहणी दौऱ्यात आयआयटी मुंबईच्या चमूने महानगरपालिकेच्या अभियंत्यांना मार्गदर्शन केले. या प्रकल्पाच्या ठिकाणी येणाऱ्या विविध आव्हानात्मक विषयांच्या अनुषंगाने चर्चाही करण्यात आली. सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पुढील टप्प्यातील कामांमध्ये अधिक काळजी घेण्याच्या अनुषंगानेही आयआयटी चमूने सूचना दिल्या. सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर अशा एकूण ७०१ किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत करण्यात येत आहेत.