गावकऱ्यांनाच चूलनिर्मितीचे धडे

मुंबई : एखाद्या संशोधनाचा समाजाला किती फायदा होतो यावर त्याचे यश अवलंबून असते. असे यश मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’तील (आयआयटी) ‘सर्वोत्कृष्ट सौरचूल’चा सन्मान मिळालेल्या प्रकल्पाला मिळाले आहे. सामान्यांनाही वापरता येणे शक्य असल्याने खेडय़ापाडय़ांमध्ये ही चूल पोहोचविण्यात येणार आहे. ‘आयआयटी’ने या सौरचूलच्या संशोधनावर कोणतेही हक्क दाखविलेले नाही. गावखेडय़ातील ग्रामस्थांनाच चूल तयार करण्याचे व तिच्या देखभालीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने भविष्यात या सौरचुली गावोगावी पाहायला मिळणार आहेत.

सौरचुलीची ठोकळेबाज रचना आणि त्यातून जेवण तयार होण्यासाठी लागणारा विलंब या कारणांमुळे ही चूल घराघरांत पोहोचू शकली नाही. मात्र, आयआयटीतील ‘ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी’ विभागाचे प्राध्यापक चेतन सिंग सोलंकी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या तांत्रिक अडचणींवर मात करत ऊर्जासंचय करून जेवण शिजवणारी सौरचूल तयार केली आहे. ‘इंडक्शन मशीन’प्रमाणे दिसणाऱ्या या सौरचुलीचा आकार गॅस शेगडीइतकाच आहे. सोलार पॅनलमधून निर्माण होणाऱ्या सौरऊर्जेचे ‘फोटोव्होल्टिक’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण करून इंडक्शनप्रमाणे काम करणारी ही सौरचूल सोयीची तर आहेच शिवाय यावर सर्वप्रकारचे जेवण शिजवणे शक्य आहे, असे प्रा. चेतन सिंग सोलंकी यांनी सांगितले.

प्राध्यापक सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या चुलीला नुकत्याच झालेल्या ओएनजीसी सौरचूल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून एक हजार सौरचूल तयार करण्यासाठी आर्थिक मदतही मिळाली आहे. या निधीतून खेडय़ापाडय़ातील लोकांच्या सहभागाने सौरचूल उभारण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गावांतील लोकांना सौरचूल स्वत: तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याची माहिती सोलंकी यांनी दिली.

* आयआयटी’च्या सौरचुलीची वैशिष्टय़े

* एका वेळेस दोन भांडय़ांमध्ये जेवण शिजवण्याची सुविधा.

* पाच व्यक्तींचा तीन वेळचा स्वयंपाक बनवण्याइतकी ऊर्जाक्षमता.

* तापमान नियंत्रणासाठी बटण.

* ऊर्जा साठवण्यासाठी तीन किलोवॉट क्षमतेची बॅटरी. बॅटरी ‘ओव्हरचार्ज’ होऊ लागल्यास ऊर्जासंचय प्रक्रिया आपोआप खंडित

* ८०० ते १००० वॉटच्या सौरपॅनेलचा वापर.

पाच वर्षांसाठी ३५ हजार खर्च

सध्या सोलार पॅनेल आणि इतर साहित्यासह या चुलीची किंमत सुमारे ५० हजार आहे. मात्र मोठय़ा प्रमाणावर निर्मिती केल्यानंतर साधारण ३५ हजार खर्च येईल. तसेच एकदा ही चूल बसविल्यानंतर पाच वर्षांपर्यंत कोणताही खर्च येणार नाही. एकत्र पैसे देणे शक्य नसल्यास हप्त्यावर ही चूल उपलब्ध करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

भात शिजविण्यासाठी सोलार कुकर

पोळ्या ठेवायच्या डब्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन भात शिजविण्यासाठी सौर कुकरही साकारण्यात आला आहे. या डब्याला केलेल्या तारांची जोडणी बॅटरीला लावल्यास बॅटरीमध्ये साठविलेल्या ऊर्जेच्या मदतीने काही मिनिटांमध्ये भात शिजतो. सौरचुलीसोबत हा कुकरही देण्यात येणार आहे.

Story img Loader