लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : देशामध्ये विद्यापीठ, महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक संशोधनाला चालना मिळावी यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ‘पेअर’ उपक्रमांतर्गत ‘हब ॲण्ड स्पोक’ प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) व पुण्याची इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या दोन संस्थांची पार्टनरशिप फॉर एक्सेलरेटेड इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च (पीएआयआर – पेअर) म्हणजे मुख्य संस्था म्हणून निवड झाली आहे. या दोन्ही संस्था राज्यातील विविध विद्यापीठे व शिक्षण संस्थांना संशोधनासाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी सोमवारी मुंबईत दिली.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात ‘अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशन : ट्रान्सफॉर्मिंग सायन्स ॲण्ड टेक्नोलॉजी लँडस्केप ऑफ भारत या विषयावरील व्याख्यानादरम्यान करंदीकर यांनी उपरोक्त माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन कार्याला चालना देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध नवीन योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून या संस्थांना संशोधनासाठी एक हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. यातील ३० टक्के रक्कम मुख्य संशोधन संस्थेला, तर उर्वरित ७० टक्के रक्कम उप संस्थेला मिळणार आहे.
आणखी वाचा-गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य, उच्च न्यायालयाची टिप्पणी
वन नेशन, वन सबक्रिप्शन जर्नल
देशामध्ये जवळपास ३१ प्रकाशक असून, १२ हजार जर्नल्स आहेत. ही सर्व जर्नल्स विकत घेण्यासाठी विद्यापीठांकडे पुरेसा पैसा नसतो. काही मोजक्याच संस्था पाच ते सहा हजार जर्नल्स विकत घेतात. त्यामुळे, सर्व शिक्षण संस्थांना १२ हजार जर्नल्स विकत घेता यावीत यासाठी प्रत्येक वर्षी दोन हजार कोटी याप्रमाणे तीन वर्षांसाठी सहा हजार कोटी निधी उपलब्ध केला जाणार आहे.