मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या जेईई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईला (आयआयटी मुंबई) पसंती दिली आहे. अव्वल दहा विद्यार्थी आयआयटी मुंबईत दाखल होणार आहेत. या शैक्षणिक वर्षासाठी आयआयटीतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी १७ जुलै रोजी जागा वाटप करण्यात आले. यात जेईई परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला पसंती दिल्याची निदर्शनास आले आहे.
पहिल्या १० क्रमांकात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईची निवड केली आहे. पहिल्या २५ मधील २३ विद्यार्थ्यांनी तर पहिल्या ५० मधील ४७ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईची निवड केली आहे. त्यात एका विद्यार्थिनीचा तर ४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्या ७५ पैकी ६६ विद्यार्थ्यांनी तर १०० पैकी ७२ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला पसंती दिली आहे.
जेईई (ॲडव्हान्स) परीक्षेत अव्वल गुण मिळवणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला पसंती दिली आहे. त्याचा अभिमान आहे. या विद्यार्थ्यांचे आयआयटी मुंबईत स्वागत करतो, अशा शब्दात आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले.
आयआयटी मुंबईला १३० कोटींचे सहकार्य
जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोतीलाल ओसवाल फाऊंडेशनकडून आयआयटी मुंबईला १३० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भातील भागीदारी करार नुकताच झाला. या करारांतर्गत आयआयटी मुंबईच्या परिसरात १ लाख ते १.२ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर मोतीलाल ओसवाल ज्ञान केंद्र बांधण्यात येणार आहे. नावीन्य, संशोधन आणि संशोधनासाठी अत्याधुनिक शैक्षणिक केंद्र म्हणून ते काम करेल. शैक्षणिक उत्कृष्टता, प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे यामुळे मोतीलाल ओसवाल ज्ञान केंद्र हे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आयआयटी मुंबईतून जागतिक नेतृत्व घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. राष्ट्रनिर्मिती आणि आर्थिक क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण वाटचाल आहे.
मोतीलाल ओसवाल फाऊंडेशनद्वारे देण्यात आलेले हे योगदान भारतीय शैक्षणिक संस्थांना आतापर्यंतचे विविध संस्थांनी दिलेले सर्वात मोठे सामाजिक दायित्व योगदान आहे. मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अग्रवाल, एमओएफएसएलचे सह-संस्थापक यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून चार हजार कोटी सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात येणार आहे.