मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईमध्ये (आयआयटी, मुंबई) शिक्षणासाठी येणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी बांधीव क्षेत्र (बिल्ट अप) ९ लाख चौरस मीटरवरून १६ लाख चौरस मीटरपर्यंत वाढविण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच संशोधन आणि विकासासाठी ५०० कोटी रुपयांची जागतिक दर्जाची उपकरणे खरेदी करण्यात आल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले.
आयआयटी, मुंबईचा विकास व विस्तार करण्यासाठी ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये दोन टप्प्यात संस्थेचे निरीक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात विविध शैक्षणिक विभागांचे बाह्य समितीद्वारे अवलोकन करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात संस्थात्मक पुनरावलोकन समितीच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये भारतातील आणि परदेशातील नामवंत तज्ञांचा समावेश होता. या निरीक्षणामध्ये आयआयटी मुंबईने २०१८ ते २०२२ या पाच वर्षांमधील कार्याचा आढावा घेतला. समितींच्या माध्यमातून नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणानुसार आयआयटी, मुंबईने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जागेअभावीहा विस्तार उभा असणार आहे. विस्तार करताना परिसरातील झाडांची निगा राखण्याबरोबरच पर्यावरणाची जोपासना करण्यात येईल, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले.
हेही वाचा : कुर्ला मतदारसंघातील उमेदवाराला स्वपक्षातूनच विरोध, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात नवी डोकेदुखी
विद्यार्थी, प्राध्यापक आणि वाढत्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आयआयटी, मुंबईचे बांधीव क्षेत्र ९ लाख चौरस मीटरवरून १६ लाख चौरस मीटरपर्यंत वाढवण्याची योजना आखण्यात येत आहे. यामुळे बांधीव क्षेत्राची मर्यादा ७५ टक्क्यांहून अधिक वाढणार आहे. संस्थेचा विस्तार व विकासात येणाऱ्या अडचणींवर येत्या काही वर्षांमध्ये मात करण्याचा प्रयत्न आहे. सध्या आयआयटी, मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासाठी १२ हजार खोल्या आहेत. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये ही संख्या १६ हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे प्रा. केदारे यांनी सांगितले.
हेही वाचा : मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त
आयआयटी मुंबईच्या निरंतर वाढीसाठी आणि शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातमध्ये नेतृत्व करण्यासाठी समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा विस्तार करण्यात येत आहे. लिक्विड हेलियम, हाय परफॉर्मन्स कंप्युटिंग, न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्स यासारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची ५०० कोटी रुपयांची उपकरणे आयआयटी, मुंबईने खरेदी केली आहेत. ही उपकरणे केवळ संस्थेचे प्राध्यापक आणि विद्यार्थीच नव्हे तर अन्य संस्था आणि महाविद्यालये देखील नाममात्र शुल्कात वापरू शकतात, असेही त्यांनी सांगितले. मानव संसाधन विकास मंत्रालयाने आयआयटी, मुंबईला ‘इस्टिट्यूट ऑफ एमिनेन्स’ (आयओई) म्हणून वर्गीकृत केले आहे. या योजनेअंतर्गत, आयओई टॅग असलेल्या आयआयटी, मुंबईला एक हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.