गेल्या काही दिवसांपासून मुंबई IIT मधील वार्षिक संमेलन कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एका नाटकाची चर्चा पाहायला मिळत आहे. संस्थेत पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ हे नाटक सादर केलं होतं. त्यात प्रभू श्रीराम आणि सीता यांचा अवमान झाल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली. यानंतर झालेल्या चौकशी आणि कारवाईमध्ये काही विद्यार्थ्यांना तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून काहींना हॉस्टेलमधून निलंबितही करण्यात आलं आहे. यासंदर्भात मुंबई IITचे संचालक-प्राध्यापक शिरीष केदारे यांनी संस्थेची बाजू मांडली आहे.
नेमकं काय घडलंय मुंबई IITमध्ये?
या वर्षी एप्रिल महिन्यात मुंबई IITमधील वार्षिक कार्यक्रमात एक नाटक सादर करण्यात आलं होतं. ‘राहोवन’ नावाच्या या नाटकातील संवाद व सादरीकरण यामुळे प्रभू श्रीराम आणि सीता यांचा अवमान झाल्याची तक्रार संस्थेतील इतर काही विद्यार्थ्यांनी केली. जवळपास ४० तक्रारी संचालकांकडे प्राप्त झाल्या. त्यावर संस्थेन दखल घेऊन चौकशी समिती नेमली. या समितीनं गेल्या महिन्यात आपला अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे गुरुवारी अर्थात २० जून रोजी नाटकात सहभाग घेतलेल्या ८ विद्यार्थ्यांवर आर्थिक दंड आणि हॉस्टेल निलंबन अशी कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईचं स्वरूप काय?
संस्था संचालक केदारे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी साधलेल्या संवादात दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी हे तिसऱ्या वर्षाला आहेत. ते पुढील महिन्यात उत्तीर्ण होतील. त्यांना प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम तेथील एका सेमिस्टरच्या फीएवढी असल्याचं सांगितलं जात आहे. तर इतर चार विद्यार्थी हे अजून काही काळ संस्थेच त्यांचं शिक्षण घेणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये आणि काही काळासाठी हॉस्टेलमधून निलंबन अशा कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
संस्थेचं नेमकं म्हणणं काय?
या सर्व प्रकरणात संस्थेची नेमकी भूमिका काय? यावर केदारे यांनी भाष्य केलं आहे. “ही संस्था विद्यार्थ्यांचा विचार करणारी आहे. या नाटकात संवादांप्रमाणेच इतरही अनेक आक्षेपार्ह गोष्टी आहेत. पण ते अजूनही आमचे विद्यार्थी आहेत. कुणालाही संस्थेतून निलंबित करण्यात आलेलं नाही. त्यांच्या करिअरवर कोणताही डाग लागू नये, म्हणून आम्ही फक्त आर्थिक दंड ठोठावला आहे. ज्यांचे अभ्यासक्रम बाकी आहेत, ते संस्थेतच राहतील आणि ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत आहे, त्यांना पदवीही दिली जाईल”, असं केदारे म्हणाले. दरम्यान, या नाटकातील इतर कोणत्या आक्षेपार्ह गोष्टी चौकशी समितीला खटकल्या, यावर मात्र त्यांनी भाष्य केलं नाही.
दंडाची रक्कम कशी ठरली?
दरम्यान, आर्थिक दंडाची रक्कम १ लाख २० हजार कशी ठरली? यावर शिस्तपालन समितीकडून राबवण्यात आलेल्या प्रक्रियेनंतर हे ठरवण्यात आल्याचं केदारे म्हणाले. “शिस्तपालन समितीकडून ही रक्कम ठरवण्यात आली. पण यासंदर्भात काही तक्रार असल्यास किंवा रक्कम जमा करण्यात अडचणी येत असल्यास संबंधित विद्यार्थी प्रशासनाशी चर्चा करू शकतात. यात काय करता येऊ शकेल ते आम्ही बघू”, असं शिरीष केदारे यांनी स्पष्ट केलं आहे.
“ही पूर्ण चौकशी पारदर्शकपणे पार पडली आहे. शिस्तपालन समितीच्या कामकाजावेळी संबंधित विद्यार्थीही उपस्थित होते. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्याचं त्यांना माहिती आहे. आमची संस्था विद्यार्थ्यांचा पूर्ण विचार करते. मी स्वत:देखील इथे विद्यार्थी राहिलो आहे. संस्थेचे दरवाजे कधीही विद्यार्थ्यांसाठी बंद नसतात”, असंही केदारे यांनी स्पष्ट केलं.