मुंबई : मागील काही दशकांत मोठ्या शहरांमध्ये पूर येण्याचे प्रमाण वाढल्याने मालमत्ता व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काँक्रीट किंवा डांबर वापरून बांधलेले पदपथ आणि रस्ते यामुळे जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अतिवृष्टीनंतर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या बाबी लक्षात घेऊन इमारतींवर हरित छत उभारल्यास शहरात निर्माण होणारी पूरस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य असल्याचे ‘आयआयटी मुंबई’ने केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

वर्षा उद्यान, खडकांत पाणी झिरपण्याची प्रणाली आणि हरित छते यांच्या एकत्रित परिणामकारकतेचा अभ्यास या आधी काही प्रमाणात पाश्चात्य देशांमध्ये झाला आहे. केवळ हरित छतांच्या परिणामकारकतेचा अभ्यास भारतात क्वचित झाला. शहरी भागांमध्ये ‘हरित छत’पुराचे प्रमाण कमी करण्यात कितपत प्रभावी ठरू शकतात याबाबत अहमदाबाद येथील ‘प्रयास सेप्ट’ विद्यापीठाचे अध्यापक तुषार बोस, ‘आयआयटी मुंबई’चे प्रा. प्रदीप काळबर आणि प्रा. अर्पिता मंडल यांनी अभ्यास केला. हे संशोधन ‘जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट’मध्ये प्रकाशित केला आहे.

हेही वाचा…३८ हजार कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा, एक लाख ११ हजार १६९ कामगारांची कागदपत्रे सादर

u

हरित छताची क्षमता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधकांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील ओढव येथे एक प्रतिरूप तयार केले. १०० एकरांच्या या भागामध्ये हरित छते उभारता येतील अशा इमारती शोधल्या. धातू किंवा काँक्रीटचे पत्रे असलेल्या इमारतींवर आणि औद्याोगिक इमारतींवर हरित छते उभारता येत नाहीत. जमिनीचा वापर, पावसाची स्थानिक परिस्थिती, भूप्रदेश आणि पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नैसर्गिक मार्ग यांचा अभ्यास करून वाहून जाणारे पाणी आणि पूर यांच्या प्रमाणाचे गणित मांडले. संगणकीय प्रतिरूप वापरून पाण्याच्या प्रवाहाचे अनुकरण केले.

संशोधकांनी इमारतींच्या २५ टक्के, ५० टक्के आणि ७५ टक्के भागांवर हरीत छत बसवले. पावसाच्या ३६ वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये पुराच्या पाण्याची घट तपासली.

हेही वाचा…Nawab Malik : भाजपा नवाब मलिक व सना मलिक यांचा प्रचार करणार? आशिष शेलार म्हणाले, “राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे…”

यामध्ये इमारतींवरील हरित छतांचे प्रमाण, दर २, ५, १० आणि २५ वर्षांनी कोसळणाऱ्या अतिमुसळधारा आणि २, ३ आणि ४ तास सलग कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसाचा अभ्यास केला. यामध्ये संशोधकांनी १२ विविध घटनाक्रम तयार केले, यामध्ये मुसळधार पावसाचे प्रमाण आणि कालावधी बदलला, तसेच प्रत्येक घटनेसाठी लागणारे हरित छताचे प्रमाण कमी केले.

उभारणी कशी?

इमारतींच्या छतांवर एका जलरोधक (वॉटरप्रूफ) पडद्यावर मातीचा एक उथळ थर तयार करून त्यात झाडे लावून आणि जलनि:सारण उपाययोजना करून हरित छत तयार करता येते. उन्हाळ्यात हरित छत इमारतीला थंड ठेवतात आणि पावसाचे पाणी शोषून घेतात. जास्तीचे पाणी हळूहळू वर्षा जल संचयन पद्धतीत पुनर्भरण करते, ज्यामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी करता येते.

निष्कर्ष काय?

दोन वर्षांच्या कालावधीत एका वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास हरित छत वापराच्या टक्केवारी प्रमाणानुसार पुराच्या पाण्याचे प्रमाण १० ते ६० टक्के कमी होते. ही घट केवळ हरित छतांच्या उपाययोजनेच्या प्रमाणाशी समप्रमाणात नसून, जलनि:सारण वाहिनीच्या जाळ्याशी सुद्धा संबंधित आहे. जेव्हा २५ टक्क्यांहून कमी इमारतींवर हरित छत होते, तेव्हा पुराचे प्रमाण आणि पाणी वाहून जाण्याचे प्रमाण यातील घट ५ टक्के इतकी कमी होती.