मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) या संस्थेत मार्चमध्ये झालेल्या कला महोत्सवात काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘राहोवन’ नाटकात श्रीराम आणि सीता या हिंदू देवतांवर विडंबन करण्यात आले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी या नाटकाचा निषेध केला होता. याची दखल घेत आयआयटी, मुंबई प्रशासनाने हिंदू देवदेवतांचे विडंबन केल्याप्रकरणी नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये दंड ठोठावला. हा दंड विद्यार्थ्यांच्या एका सत्राच्या शुल्का इतका आहे.

आयआयटी मुंबईमध्ये ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सवात हे नाटक सादर करण्यात आले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी ‘आयआयटी बी फॉर भारत’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर नाटकात विडंबन केलेली चित्रफित पोस्ट करून निषेध केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी नाटकात रामायणाची थट्टा केल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी शैक्षणिक स्वातंत्र्याचा गैरवापर केला असल्याचेही म्हटले आहे. याची दखल घेत आयआयटी प्रशासनाने ८ मे रोजी चौकशीसाठी समितीची स्थापना केली. या समितीने विद्यार्थ्यांची चाैकशी केली. त्यानंतर या आरोपामध्ये तथ्य आढळून आल्याने समितीने दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस प्रशासनाकडे केली. त्यानुसार ४ जून रोजी आयआयटी प्रशासनाने नाटकात सहभागी विद्यार्थ्यांना दंड ठोठावणारी नोटीस पाठवली. यामध्ये विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम २० जुलै २०२४ पर्यंत आयआयटी मुंबईच्या अधिष्ठात्यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच संस्थेच्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ बंद करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश मिळेपर्यंत हे लाभ बंद ठेवण्यात येतील, असे नोटिशीमध्ये स्पष्ट केले होते.

हेही वाचा – म्हाडाचा लोकशाही दिन आता ८ जुलै रोजी, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच लोकशाही दिन

हेही वाचा – मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल; सीएसएमटी लोकलची धाव परळ, कुर्ल्यापर्यंत

‘आयआयटी बी फॉर भारत’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेने विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याबाबत बजावण्यात आलेली नोटीस ‘एक्स’वर पोस्ट करून संस्थेच्या कारवाईचे स्वागत केले. दरम्यान कारवाईबाबत प्रशासनाशी चर्चा करून काही तोडगा निघण्याची विद्यार्थ्यांना आशा होती. परंतु बुधवारी ही नोटीस समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्याने ती आशा मावळली असल्याचे कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांच्या मित्रांकडून सांगितले. रामायणातील पात्रांची नावे व कथानकात बदल करून स्त्रीवादी नाटक सादर करण्यात आले होते, यावर प्रेक्षक व स्पर्धेच्या ज्युरींनीही कोणताही आक्षेप घेतलेला नाही, असे कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांच्या अन्य एका सहकाऱ्याने सांगितले. दरम्यान, याबाबत आयआयटी, मुंबई प्रशासनाने आणि कारवाई केलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला.