मुंबई : तंत्रज्ञानातील विविध आविष्कारांचा खजिना आणि विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक उत्सव असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व सर्वांच्या भेटीस आले आहे. यंदा हा महोत्सव १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयआयटी मुंबईच्या पवई संकुलात रंगणार आहे. याच कालावधीत ‘टेकफेस्ट’अंतर्गत विविध स्पर्धांसह व्याख्यानमाला आणि कार्यशाळा होणार आहेत. तर मुंबई विभागीय प्राथमिक फेरी ६ ऑक्टोबरला रंगणार असून त्यासाठी नावनोंदणीला सुरूवात झाली आहे. विविध स्पर्धांच्या प्राथमिक फेरीसाठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थी स्पर्धकांना https://techfest.org/competitions नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच संबंधित स्पर्धांबाबत इत्यंभूत माहिती आणि अटी जाणून घेता येईल.

मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत मेश्मराइझ, कोझमोक्लेंच, कोडकोड आणि टेकफेस्ट ऑलिम्पियाड या चार स्पर्धा रंगतील. यंदाही प्रेक्षकांना रोबोटचा रोमहर्षक थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘मेश्मराइझ’ या स्पर्धेत स्पर्धकांना एक विशिष्ट रोबोट तयार करायचा आहे आणि या रोबोटला आखून दिलेल्या मार्गावरच चालायचे आहे. या स्पर्धेसाठी अंतिम फेरीतील विजेत्यांना ८० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. ‘कोझमोक्लेंच’ या स्पर्धेतही विद्यार्थ्यांना एक रोबोट तयार करायचा आहे, या रोबोटला अडथळ्यांची शर्यत पार करून अंतिम लक्ष्य गाठायचे आहे. या स्पर्धेसाठीही अंतिम फेरीतील विजेत्यांना ८० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

हेही वाचा : मेट्रो ३ : आरे – बीकेसी भुयारी मार्गिकेवर दररोज मेट्रोच्या ९६ फेऱ्या, दिवसाला साडेचार लाख प्रवासी संख्या अपेक्षित

‘कोडकोड’ या स्पर्धेत स्पर्धकांना म्हणजे प्रोग्रमरना कोडिंग करायचे असून त्यामधील जटील समस्या सोडवायच्या आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना ४० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. ‘टेकफेस्ट ऑलिम्पियाड’ ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि वैज्ञानिक जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी कुशल बनवते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा कस लागणार असून त्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत. या स्पर्धेत इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

हेही वाचा : मुंबई: दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

यंदा ‘टेकफेस्ट’ ‘शाश्वत नावीन्यपूर्ण सचेतनता – जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता शाश्वतता पूर्ण करते’ (The Sustainnovative Sentience – Where AI Meets Sustainability) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. तर मुंबई व्यतिरिक्त ‘आयआयटी टेकफेस्ट’ची विभागीय प्राथमिक फेरी इतर शहरांमध्येही रंगणार आहे. बंगळुरू येथे ५ ऑक्टोबर, तर मुंबई व भोपाळ ६ ऑक्टोबर, नागपूर १९ ऑक्टोबर आणि हैदराबाद व जयपूरमध्ये २० ऑक्टोबर रोजी विभागीय प्राथमिक फेरी रंगणार आहे.