मुंबई : नाविन्यपूर्ण विविध आविष्कारांचा खजिना आणि विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयआयटी, मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व १७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. हा महोत्सव १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयआयटी, मुंबईच्या पवई संकुलात रंगणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतासह जगभरातील नागरिक हा महोत्सव पाहण्यासाठी येणार आहेत. यंदाचा ‘टेकफेस्ट’ हा ‘शाश्वत नावीन्यपूर्ण सचेतनता जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता शाश्वतता पूर्ण करते’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे.

यंदा ‘टेकफेस्ट’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाभोवती फिरणाऱ्या निरनिराळ्या स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी सर्वांसाठी उपलब्ध आहे. ‘टेकफेस्ट’मध्ये सर्वांचेच आकर्षण असणारी आंतरराष्ट्रीय ‘रोबोवॉर’ ही रोमहर्षक स्पर्धा यंदाही ८, १५, ३० आणि ६० किलो वजनी गटात १७ आणि १८ डिसेंबर रोजी ओपन एअर थिएटरमध्ये रंगणार आहे. यंदा ‘टेकफेस्ट’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात तिनही दिवस चीनमधील युनिट्री जी वन ह्युुमनॉईड रोबोटपाहायला मिळणार आहे. हा रोबोट पहिल्यांदाच भारतात येत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींना आंतरराष्ट्रीय प्रदर्शन हे पवई संकुलातील के. व्ही. मैदानावर पाहता येईल. कार्यक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व सहभागाच्या नावनोंदणीसाठी https:// techfest. org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘टेकफेस्ट’ समितीतर्फे करण्यात आले आहे. तसेच techfest_ iitbombay या ‘इंस्टाग्राम’ माध्यमावरतीही अधिक माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधित निरनिराळ्या विषयांवर कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

हेही वाचा : मुंबई : प्रवाशांच्या डोक्यावर असुरक्षिततेची टांगती तलवार, अनेक ठिकाणी बस थांब्यांऐवजी केवळ बस खांबच

रोबोद्वारे ‘डीजे कॉन्सर्ट’ची उत्सुकता

दरवर्षी टेकफेस्टच्या ‘ईडीएम नाईट’ (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) म्हणजेच ‘डीजे नाइट’ची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा मात्र एक पाऊल पुढे जात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा मिलाफ करून रोबोद्वारे ‘डीजे कॉन्सर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. जपानमधील ‘डीजे रोबोट’ प्रथमच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. एआयआयटी मुंबईच्या पवई संकुलातील ओपन एअर थिएटरमध्ये गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून जगातील पहिलीवहिली ‘रोबो डीजे कॉन्सर्ट’ रंगणार असून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Story img Loader