मुंबई : मोबाईल ॲप्सपासून ऑनलाइन गेम, स्मार्ट ॲक्सेसरीजपासून डिजिटल उपकरणे वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी इंटरॅक्शन डिझाइनची (परस्परसंवाद डिझाइन) आवश्यकता असते. मागील काही वर्षांत व्यावसायिक डिजिटल डिझायनरची वाढती मागणी लक्षात घेता आयआयटी मुंबईच्या आयडीसी स्कूल ऑफ डिझाइनने इंटरॅक्शन डिझाइन आणि ह्युमन-कॉम्प्युटर इंटरॅक्शनबरोबर (एचसीआय) संबंधित ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॅक्शन डिझाइन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यावसायिकांना आयआयटी मुंबईकडून शैक्षणिक क्रेडिट्स देण्यात येणार आहे. मागील २५ वर्षांत आयआयटी मुंबईकडून प्रथमच व्यावसायिकांना शैक्षणिक क्रेडिट्स देण्यात येणार आहेत.
आयआयटी मुंबईच्या आयडीसी स्कूल ऑफ डिझाइनने इंटरॅक्शन डिझाइन आणि ह्युमन-कॉम्प्युटर इंटरॅक्शनबरोबर (एचसीआय) संबंधित कार्यरत व्यावसायिकांना २५ वर्षांपासून लघु अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. मात्र मागील काही वर्षांत व्यावसायिक डिजिटल डिझायनरची वाढती मागणी लक्षात घेता आयआयटी मुंबईने व्यावसायिकांसाठी असलेल्या पदव्युत्तर पदविका कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॅक्शन डिझाइन हा नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय असलेला आणि २००० पासून आयआयटी मुंबईने सुरू केलेल्या ह्युमन-कॉम्प्युटर इंटरॅक्शन या अभ्यासक्रमाचा १२ क्रेडिट्ससह डिझाइन ऑफ इंटरॅक्टिव्ह प्रॉडक्ट्स या शीर्षकाखाली यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर ७ अन्य अभ्यासक्रमांसह, विद्यार्थ्यांसाठी डिझाइनमधील गुणात्मक संशोधन पद्धती, डिझाइनमधील परिमाणात्मक संशोधन पद्धती, परस्परसंवाद डिझाइनमधील मानवी घटक, आभासी आणि संवर्धित वास्तवाचा परिचय, गेम डिझाइन तत्त्वे आणि सराव, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि डिझाइनमधील सैद्धांतिक दृष्टीकोन हे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.
या उपक्रमामुळे आयआयटी मुंबईकडून मागील २५ वर्षांत प्रथमच व्यावसायिकांना शैक्षणिक क्रेडिट्स दिले जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक अभ्यासक्रमासाठी व्यावसायिकांना ६ ते १२ क्रेडिट्स मिळणार आहेत. एकदा शिकणाऱ्याने ३६ किंवा त्याहून अधिक क्रेडिट्स (५ ते ६ अभ्यासक्रमांना उपस्थित राहून) मिळवले की ते आयआयटी मुंबईकडून ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॅक्शन डिझाइन ही पदवी मिळविण्यासाठी वापरू शकतात. विद्यार्थी हे क्रेडिट्स शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये जमा करू शकतात आणि इतर कार्यक्रमांसाठी ते वापरू शकतात.
ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॅक्शन डिझाइन या संपूर्ण कार्यक्रमासाठी उमेदवारांना आगाऊ नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, परंतु एखाद्या अभ्यासक्रमामध्ये उमेदवाराला रस असेल तर त्यांना त्यांच्यासाठीच नोंदणी करावी लागणार आहे. या अभ्यासक्रमाचा पहिला वर्ग १७ मार्च ते १ एप्रिल २०२५ दरम्यान प्रत्यक्ष चालणार आहे. ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॅक्शन डिझाइन या कार्यक्रमातील काही अभ्यासक्रम प्रत्यक्ष चालणार आहेत, तर काही ऑनलाइन आणि काही दोन्ही पद्धतीने चालणार आहेत. सर्व आगामी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू झाली आहे.