संरक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्यात आयातीवर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक आहे. भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे आणि आधुनिक आयुधे भारतीय संरक्षण खात्याला मजबूत करतील आणि त्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हे धोरण महत्त्वाचे आहे, देशभर पसरलेल्या आयआयटी संस्थानांचा मोठा फायदा या धोरणासाठी होईल, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसोहळ्यात मनोहर पर्रिकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या समारंभामध्ये ते बोलत होते.
आयआयटी मुंबईमधून पदवी घेतलेल्या आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे केला जातो. १९७३ साली आयआयटीमधून पदवी घेतलेले मनोहर पर्रिकर यंदाचे मानकरी होते. देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी काही ठोस योजना डोळ्यासमोर आहेत. दोन लाख २९ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतुद असलेल्या या खात्याचा बहुतांश पैसा आयातीवर खर्च होतो. शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान यांसाठी भारत मुख्यत्वे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. मात्र आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये हे परावलंबित्व धोकादायक ठरू शकते. म्हणूनच भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रे महत्त्वाची ठरतात. त्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘तेजस’ हे हलक्या वजनाचे लढाऊ विमान आणि ‘अर्जुन’ हा रणगाडा तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, असे पर्रिकर म्हणाले. या प्रयत्नांना आता यश आले असून ‘तेजस’ आयआयटी आणि संरक्षण क्षेत्र यांतील समन्वय वाढवण्यासाठी आणि या संस्थांमध्ये चालू असलेल्या संशोधनाचा उपयोग संरक्षण क्षेत्रात करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही पर्रिकर यांनी दिली. त्यासाठी ‘डीआरडीओ’च्या समितीमध्ये आयआयटीयन्सचा समावेश करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे समन्वयात प्रचंड फायदा होईल. हे संशोधन केवळ शस्त्र पुरवठय़ासाठीच उपयोगी नसून त्यांचा फायदा संरक्षणासाठी पायाभूत सोयीच्या विकासासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण झाल्यास त्या शस्त्रास्त्रांची आणि नव्या तंत्रज्ञानाची चाचणी करणे, त्या शस्त्रास्त्रांच्या गुणवत्तेसाठी प्रमाण ठरवणे, या गोष्टी अधिक काटेकोरपणे करता येतील.
तीन कोटींची मदत
आयआयटीमधून पदवीधर होऊन यंदा २५ वर्षे पूर्ण झालेल्या १९८९च्या विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याचे निमित्त साधून आपल्या या संस्थेला घसघशीत मदत केली. ‘लिगसी प्रोजेक्ट’ या नावाखाली होणाऱ्या योजनेसाठी या विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून तीन कोटी रुपयांची मदत आयआयटीला दिली.
‘मेक इन इंडिया’त आयआयटी हवी
संरक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्यात आयातीवर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक आहे. भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे आणि आधुनिक आयुधे भारतीय संरक्षण खात्याला मजबूत करतील आणि त्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हे धोरण महत्त्वाचे आहे
First published on: 29-12-2014 at 02:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit should be part of make in india manohar parrikar