विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळेस इंटरनेट वापरावर घालण्यात आलेले र्निबध मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने (आयआयटी) तब्बल दशकभरानंतर दूर केले आहेत. परंतु सध्या आयआयटीचीच इंटरनेट सेवा मंद गतीने चालत असल्याने सध्या तरी विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापराबाबत फारसा उत्साह नाही.
येथे शिकणारे विद्यार्थी संगणक खेळांकरिता आणि मनोरंजनाकरिता इंटरनेटचा वारेमाप वापर करीत असल्याचे आढळून आल्यानंतर आयआयटीने २००५ साली ही बंदी घातली होती. शैक्षणिक कामगिरी खालावलेल्या एका विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण हे या करिता तात्कालिक ठरले होते. हा विद्यार्थी रात्रीअपरात्रीही संगणक खेळात गुंतलेला असे. त्याचा परिणाम अभ्यासावर होऊन त्याची शैक्षणिक कामगिरी खालावली होती. त्यानंतर आयआयटीने पाहणी केली असता बरेच विद्यार्थी रात्री संगणक आणि इंटरनेटवर आपला वेळ वाया घालत असल्याचे आढळून आले होते. रात्री जागरणे केल्याने दुसऱ्या दिवशी वर्गाला हजेरी न लावणे किंवा वर्गात लक्ष न लागणे आदी प्रकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत असल्याचे निदर्शनास आल्याने आयआयटीने रात्रीच्या इंटरनेट वापरावरच र्निबध आणले. मात्र बंदीमुळे हा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात आल्याने ती उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंटरनेट वापरावरील बंधने दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जाई. परंतु त्यांच्या मागणीला संस्थेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. या प्रकारची बंदी इतरही आयआयटीमध्ये टाकली जात होती. मात्र स्थानिक वायफाय सेवेच्या मदतीने आपल्या सेलफोनवरही विद्यार्थी इंटरनेटचा वापरू शकतात, हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी ही बंदी उठवली. आता आयआयटी-दिल्ली वगळता सर्व आयआयटींनी लॅनच्या रात्रीच्या वापराबाबतचे नियम शिथिल केले आहेत.
अर्थात आयआयटीतील इंटरनेट सेवा गेले पंधरा दिवस पार कोलमडली आहे. त्यामुळे वेळेचे र्निबध दूर होऊनही विद्यार्थ्यांमध्ये फारसा उत्साह नाही.
दरवर्षी आम्ही सुट्टी काळात इंटरनेट वापरावरील र्निबध शिथिल करीत असू. परंतु आम्ही इंटरनेट वापराबाबत अशी तांत्रिक सोय करून ठेवली होती की शैक्षणिक वर्ष सुरू होताच रात्री दीड ते पहाटे पाचदरम्यान इंटरनेट आपोआप बंद राहील. पण या वेळेस आम्ही ही बंदी काढून टाकली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेटचा अमर्याद वापर करता येईल.
सौम्य मुखर्जी, विद्यार्थी उपक्रम विभागाचे अधिष्ठाता