महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एखादी बस पकडण्यासाठी एखाद्या एसटी स्थानकावर थांबलेले प्रवासी गाडी आल्या आल्या समोरच्या काचेमागे लटकलेल्या फलकावर नजर टाकतात. गंतव्यस्थान दाखवणारा हा फलक सध्या मात्र प्रवाशांना काही वेगळ्याच गोष्टी दाखवत आहे. या फलकावर सध्या कधी ज्योतिषांचा संपर्क क्रमांक, एखाद्या नगरसेवकाचा संपर्क क्रमांक आदी गोष्टी झळकत आहेत. प्रत्येक प्रवाशाचे लक्ष जाईल, अशा ठिकाणी असलेल्या या जाहिरातींमधून प्रत्यक्षात एसटी महामंडळाला काडीचाही महसूल प्राप्त होत नाही. या जाहिराती लावण्यासाठी कोणतीही परवानगी नसतानाही त्या कशा, असा प्रश्न पडला आहे.
एसटी महामंडळाचा संचित तोटा हजार कोटींच्या वर पोहोचला आहे. या तोटय़ातून डोके वर काढण्यासाठी त्याचप्रमाणे महसूलवाढीसाठी विविध पर्याय महामंडळ पाहात आहे. मात्र तरीही गंतव्यस्थान दाखवणाऱ्या फलकावर जाहिरात करण्यास महामंडळाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. असे असतानाही बहुतांश एसटी बसगाडय़ांमधील या फलकांवर छोटय़ा जाहिराती हमखास दिसतात. काही गाडय़ांवर अशा जाहिराती आढळल्यानंतर त्या काढून टाकण्याचे आदेश महामंडळातर्फे देण्यात आले होते. मात्र आगारांतून या आदेशांची अंमलबजावणी झालेली नाही.
गंतव्यस्थान दाखवणाऱ्या फलकावर जाहिराती न करण्यामागे महामंडळाचा विशिष्ट हेतू आहे. येणारी गाडी नेमकी कुठे जाणारी आहे, याची माहिती प्रवाशांना लांबूनही मिळायला हवी. त्यामुळेच महसुलाची संधी असूनही आम्ही त्या फलकांवर जाहिरातींचा परवाना दिलेला नाही, असे एसटीतील वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader