मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातल्याने आणि पालिकेनेही कडक कारवाईचे धोरण अवलंबिल्याने राजकीय पक्षांनी आता बॅनरबाजी न करता केवळ आपल्या पक्षांचे झेंडे ठिकठिकाणी फडकविण्याचा सपाटा लावला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणच्या मुख्य चौकांमध्ये सर्वपक्षिय झेंडे झळकू लागले असून बॅनर्सपाठोपाठ आता हे झेंडे पालिकेसाठी डोकेदुखी बनू लागले आहेत. नेत्यांचे वाढदिवस, कार्यक्रम, सभा, मोर्चे, आंदोलने आदींच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडून मोठय़ा प्रमाणात बॅनर झळकविण्यात येत होते. त्यामुळे मुंबईतील मुख्य चौक, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे विद्रुप होऊ लागली होती. या प्रकारांची दखल घेत न्यायालयाने तात्काळ मुंबईचे विद्रुपीकरण करणारे बॅनर्स काढण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार अखंडपणे काम करीत पालिकेने तीन दिवसांमध्ये मुंबई बॅनर्समुक्त केली होती. त्यावेळी केवळ राजकीय पक्षांचेच नव्हे तर संस्था, संघटना, धार्मिक कार्यक्रमांचे बॅनर्सही उतरविण्यात आले होते.
त्यानंतर काही दिवसांमध्येच मुंबईत पुन्हा बॅनरबाजीला उत येऊ लागला होता. राजकीय पक्षांच्या दबावामुळे पालिका अधिकारीही बॅनरकडे काणाडोळा करू लागले होते. मात्र सामाजिक संस्था न्यायालयात धाव घेण्याच्या भितीपोटी काही भागात पालिका अधिकाऱ्यांकडून बॅनर्सवर कारवाई करण्यात येत होती. मुंबईत झळकविण्यात येणाऱ्या बॅनर्सची पुन्हा एकदा न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्षाचे नेते आणि शिवसैनिकांना अनधिकृत बॅनर्स लावू नये असे आदेश दिले होते. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पालिकेने पुन्हा एकदा बॅनर्सविरोधात जोरदार कारवाई हाती घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली बंदी, पक्षाच्या नेत्यांनी दिलेले आदेश आणि आता पालिकेने सुरू केलेली कारवाई यामुळे राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी नवीच शक्कल लढविली आहे. पक्षाचा छोटा-मोठा कार्यक्रम, सभा, अथवा मोठय़ा नेत्याची विभागाला भेट आदींच्या निमित्ताने पूर्वी मोठय़ा प्रमाणावर बॅनर्स झळकविले जात होते. या बॅनर्सवर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांची छबी झळकविण्यात येत होती. पण आता कायद्याचा बडगा उगारला जाऊ नये म्हणून या नेते मंडळींनी कार्यक्रम, छोटय़ा-मोठय़ा नागरी कामाचे उद्घाटन, नेत्याच्या भेटीनिमित्त बॅनर्सऐवजी विभागामध्ये झेंडे फडकविण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणच्या चौकांमध्ये एकापेक्षा अधिक पक्षांच्या झेंडे फडकत आहेत. अचानक बॅनर्सऐवजी झेंडे ठिकठिकाणी दिसू लागल्याने ते काढायचे की नाही असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. न्यायालयाने बॅनर्समुक्त मुंबई करण्याचे आदेश दिले आहेत. झेंडे काढले तर राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास पालिकेनेही सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, मुंबई झेंडय़ांनी विद्रुप होऊ लागली आहे.