शौचालयाच्या आरक्षित भूखंडावर तीन मजली बांधकाम
दादर-नायगाव परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व माधवदास पास्ता मार्गावरील शारदा मॅन्शनच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित भूखंडावर पालिकेची परवानगी न घेताच तीन मजली इमारत अनधिकृतपणे उभी राहिली असून आता त्याच्या शेजारी अशाच पद्धतीने दुसरी इमारत बांधण्यात येत आहे. मात्र पालिका अधिकाऱ्यांना आजतागायत ही इमारत दिसलेली नाही. एकीकडे सार्वजनिक शौचालयांसाठी जागा मिळत नसल्याचा पालिका कांगावा करीत आहे, तर दुसरीकडे शौचालयांसाठी आरक्षित भूखंडाकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
दादरच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील नगर भूक्रमांक २०/७६ हा ७७३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित आहे. आज ना उद्या तेथे सार्वजनिक शौचालय उभे राहील आणि सुविधा मिळेल अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी या भूखंडावर लोखंडी बिमच्या साह्य़ाने तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. मात्र ही इमारत आजतागायत पालिकेच्या एफ-दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांना दिसलेली नाही. आता इमारतीच्या शेजारील मोकळ्या जागेवर दुसरी तीन मजली इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. अर्थात तेही पालिका अधिकाऱ्यांना दिसलेले नाही.
इमारत बांधण्यापूर्वी पालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. भूखंड आरक्षित असल्यास तो विकसित करून पालिकेला हस्तांतरित करावा लागतो. मात्र या भूखंडाच्या बाबतीत सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. कोणतीही परवानगी न घेता इमारत उभी करण्यात आली आहे. इमारतीस पालिकेकडून बांधकाम सुरू करण्याची परवानगी, पालिकेने मंजूर केलेला नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे, का याविषयी माहिती मिळविण्यासाठी इमारत प्रस्ताव विभागाकडे माहितीचा अधिकार कार्यकर्ते महेश सुर्वे यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. मात्र इमारतीच्या बांधकामास कोणतीही परवानगी देण्यात आली नसून त्याबाबतची फाईल दफ्तरी नाही, असे उत्तर देण्यात आले.
इमारतीला परवानगी नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मात्र तरीही आजतागायत कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता इमारतीच्या शेजारी आणखी एक अनधिकृत इमारत आकारास येत आहे. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने आता हे प्रकरण एफ-दक्षिण विभाग कार्यालयाकडे सोपविले आहे. या प्रकरणाची जबाबदारी एकमेकावर ढकलण्याचे काम पालिका अधिकारी करीत आहेत, अशी टीका या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.