कॉलनी परिसरात एक लाखाहून अधिक झोपडय़ा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासंदर्भात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर करताना केंद्र सरकारने मेट्रो-३ च्या कारशेडच्या प्रकल्पाला सूट दिल्यामुळे जोरदार टीका होत असताना राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असलेल्या आरे कॉलनी परिसरातील हरित पट्टा अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. सध्या संपूर्ण आरे कॉलनी परिसरात एक लाखांहून अधिक झोपडय़ा वसलेल्या असून त्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यातच आता सरकारच्या अधिसूचनेमुळे या परिसरातील विकासकामांना गती येऊन येथील निसर्गसंपदेला आणखी धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आरे कॉलनीचा परिसर सध्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या येथे होणाऱ्या कारशेडमुळे चर्चेचा विषय बनला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून जवळ असलेल्या या जैववैविध्याने नटलेल्या या पट्टय़ाला गेल्या काही वर्षांपासून ग्रहण लागले आहे. इमारती, झोपडय़ा, तबेले, दुकाने आदींनी चहूबाजूंनी आरे कॉलनीला वेढण्यास सुरुवात केली आहे. तर मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडमुळे येथील हिरवळीवर खूप मोठे अतिक्रमण होणार असल्याने त्याविरोधात पर्यावरणवाद्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
आरे कॉलनीच्या एका बाजूस असलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रस्ता, मरोळ नाका, दिंडोशी आणि गोरेगाव या चारही बाजूंनी येथे काही वर्षांपूर्वी झोपडय़ांचे अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली. आज या सगळ्याच झोपडय़ांची संख्या एक लाखांहून अधिक झाली असून आदर्शनगर, आरे युनिट क्रमांक-७ येथे या झोपडय़ांची संख्या सर्वाधिक आहे. ५ लाख रुपये एवढय़ा किमतीला यातील एक झोपडी विकली जात असून यात स्थानिक लोकप्रतिनिधी व झोपडपट्टीदादांचा याला आशीर्वाद असल्याचे एका स्थानिक कार्यकर्त्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच, येथे काही वर्षांपूर्वी आलेल्या म्हशींच्या तबेल्यांभोवती आणि कॉलनीतील आदिवासी नागरिकांच्या पाडय़ांभोवतीसुद्धा झोपडय़ा वाढल्या आहेत. त्याचबरोबर पर्यावरणावर अतिक्रमण म्हणून येथील रॉयल पाम समूहाच्या जागेकडे तसेच मेट्रो-३ प्रकल्पाच्या जागेकडे पाहिले जात असून याविरोधात आता पर्यावरणवादी एकवटू लागले आहेत. येथे या प्रकल्पाच्या कामाला विरोध होऊनदेखील सध्या ‘एमएमआरडीए’मार्फत येथे भरणीच्या कामास सुरुवात झाली आहे.
सरकार व प्रशासनाची आरे कॉलनीबाबतची एकंदर भूमिका पाहता हे जंगल आहे हे आम्हाला मान्य नाही, असे तरी सरकारने एकदा जाहीर करावे. पुन:पुन्हा येथीलच जागा पर्यावरणाच्या आड कशी येते? हा आम्हालाही पडलेला प्रश्न आहे. याबाबत आम्ही परत एकदा ‘आरे बचाव’ आंदोलनाला सुरुवात करीत आहोत.
– आनंद पेंढारकर, पर्यावरणतज्ज्ञ
आरे कॉलनीत मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामाला विरोध करीत यापूर्वी आंदोलन केले होते. मात्र, आता पुन्हा सरकारने येथील मेट्रो कारशेडसाठी अतिक्रमण चालवले आहे. त्यामुळे आम्ही आता तीव्र आंदोलन करू.
– आशीष पाटील, मनसे