कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही ठेकेदारांकडून पार्किंग शुल्काची आकारणी

वाढत्या वाहनसंख्येमुळे एकीकडे वाहनतळांची कमतरता गंभीर समस्या बनली असताना मुंबईतील पालिकेच्या ३३ वाहनतळांवर बेकायदा पार्किंग शुल्क आकारणी होत असल्याचे दिसून आले आहे. कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी परिसरातील या वाहनतळांच्या कंत्राटांची मुदत संपल्यानंतरही ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी वाहनचालकांकडून दामदुपटीने पार्किंग शुल्क वसूल करत आहेत. विशेष म्हणजे, हा पैसा पालिकेकडे न जाता ठेकेदारांच्या खिशात जात असतानादेखील पालिका व पोलीस यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस या भागामधील काही रस्ते आणि छोटय़ा गल्ल्यांमध्ये पालिकेची ५६ वाहनतळे आहे. यापैकी सुमारे ३३ रस्ते आणि गल्ल्यांमधील वाहनतळांवर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनशुल्क वसुलीबाबत कंत्राटदारांबरोबर केलेल्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे या वाहनतळांवर वाहने उभी करण्यासाठी कोणतीही शुल्क आकारणी व्हायला नको. तरीही काही ठिकाणी कंत्राटदार आणि त्याचे कर्मचारी वाहने उभी करण्यासाठी येणाऱ्यांकडून शुल्क वसुली करीत आहेत. वाहनमालकांनी पालिकेबरोबर केलेल्या कंत्राटाची प्रत दाखविण्याची विनंती केली असता हे कर्मचारी उर्मटपणे त्यांच्याशी वाद घालतात. प्रसंगी काही ठिकाणी प्रकरण हातघाईवरही येत असल्याचे प्रकार घडत आहेत.

या वाहनतळांवर काही मिनिटांसाठी दुचाकी उभी करण्यासाठी पावती न देताच १० ते २० रुपयांची वसुली केली जात आहे. तर मोटारगाडय़ा उभ्या करण्यासाठी ६०-७० रुपये उकळले जात आहेत. मनाला येईल ती रक्कम वाहनमालकांकडून घेतली जात आहे. पावतीची विचारणा केली असता पावती पुस्तिका संपली असून पालिकेने अद्याप दिलेली नाही, अशा थापा मारल्या जातात. मात्र, या सर्व प्रकाराकडे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.

या वाहनतळांचे कंत्राट संपुष्टात

फोर्ट बायलेन्स नं. १ व २, पी. एम. रोड, अदी मर्झबान रोड, रिगल सिनेमा बेट, एम. जी. रोड, बॉम्बे हॉस्पिटल लेन, जे. एन. हरदिया मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, वीर नरिमन रोड, दिनशॉ वाच्छा मार्ग, युनिव्हर्सिटी रोड, हुतात्मा चौक नं. ४, जीवन बिमा मार्ग, आयएमसीई रोड, दोराबजी टाटा (एनएस) रोड, विधान भवन मार्ग, एनसीपीए रोड, जमशेटजी टाटा रोड, विनय के. शाह मार्ग, गोयंका मार्ग, फ्री प्रेस जर्नल रोड, व्ही. व्ही. राव मार्ग, जमनालाल बजाज मार्ग, हुतात्मा चौक नं. २, हुतात्मा चौक नं. ३, नाथीबाई ठाकरसी रोड, दिनशॉ मुल्ला रोड, नाशिकराव तिरपुडे रोड, ग्यान सम्राट मार्ग, नरोत्तम मोरारजी रोड, हॉर्निमन सर्कल, व्ही. एन. रोड, एस. ए. ब्रेलवी मार्ग, मुंबई समाचार मार्ग.

ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील बहुतांश वाहनतळांचे कंत्राट संपुष्टात आले आहे. तेथे अद्याप कंत्राटदार नियुक्त केलेला नाही. या वाहनतळांवर अनधिकृतपणे शुल्क वसुली करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ए विभाग पालिका कार्यालय

Story img Loader