मुंबई: गुजरातमधून गुटखा घेऊन मुंबईत आलेले दोन टेम्पो टिळकनगर पोलिसांनी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरातून ताब्यात घेतले. या दोन्ही टेम्पोमधून पोलिसांनी २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही टेम्पो चालकांना अटक केली. राज्यात गुटखा बंदी लागू आहे. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन दोन टेम्पो मुंबईत येत असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली. घाटकोपरच्या छेडा नगर येथून हे टेम्पो मानखुर्दच्या दिशेने जाणार होते, असेही पोलिसांना समजले होते.
त्यामुळे पोलिसांनी छेडानगर जंक्शन परिसरात सोमवारी रात्री सापळा रचला. यावेळी नमुद वर्णनाचे दोन टेम्पो छेडा नगर परिसरात दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही टेम्पो अडवले आणि त्यांची तपासणी केली. राज्य सरकारने बंदी घातलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याचा मोठा साठा या टेम्पोमध्ये आढळला. पोलिसांनी तत्काळ दोन्ही टेम्पो चालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. हा गुटखा गुजरातमधून आणल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी टेम्पोचालक अब्दुल कादरी (३०) आणि आकाश हातराळे (३०) या दोघांना अटक केली असून दोन्ही टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
© The Indian Express (P) Ltd