अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांना जोरदार चपराक लगावली. न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, सपा नेते मुलायम सिंग यादव, छगन भुजबळ, सचिन अहिर आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह एकूण ४७ जणांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड करण्याचा इशारा दिला आहे . दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्याविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस जारी केली जाईल. मागील सुनावणीच्यावेळी भाजप नेते आशिष शेलार, पराग अळवणी आणि इतर राजकीय नेत्यांना न्यायालयाने दंड भरण्याचे आदेश दिले होते. त्यांनी आज न्यायालयात दंडाची रक्कम जमा केली. आशिष शेलार यांनी १ लाख ७० हजार रुपये दंडांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. तर इतरांनी १ लाख २५ हजार रुपये ‘नाम’ फाऊंडेशनला दिले. आजच्या दिवसभरात अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी एकूण ३ लाख ६० रुपये दंडाची रक्कम जमा झाली आहे.
उच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी अनधिकृत होर्डिंग लावली जाणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र यांच्याकडून न्यायालयात देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग लावल्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि आशिष शेलार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

Story img Loader