मुलुंड पूर्व येथील अग्निशमन केंद्राजवळ भर वस्तीत एका सरकारी भूखंडावर गुंडांच्या पहाऱ्यात राजरोसपणे अनधिकृत झोपडय़ा बांधण्याचे सत्र सुरू आहे. अग्निशमन केंद्रासमोर तसेच नाल्याकाठी असणाऱ्या सरकारी भूखंडावर बाहेरून आलेली काही माणसे झोपडय़ा बांधत आहेत. मोकळ्या भूखंडावर वाढलेल्या झुडपांवर रिबिनी टाकून आपापल्या जागा या मंडळींनी अडविल्या असून सध्या दिवसरात्र येथे ठाण मांडून ते जागेचा पहारा देत आहेत. झोपडय़ा बांधणारे मुलुंडबाहेरील लोक असून याबाबत मनसेने तक्रार केल्यानंतर ८ जानेवारी रोजी ही अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र आता पुन्हा या ठिकाणी जागा बळकविण्याचे काम सुरू झाले आहे.
गव्हाणपाडा येथील हा मूळ सरकारी भूखंड ९१ हेक्टर होता. मात्र आता अतिक्रमणामुळे येथे केवळ साडेसहा लाख चौरस मीटर जागा शिल्लक राहिली आहे. अतिक्रमणामुळे ही जागाही हातची जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ७ जानेवारी रोजी नवघर पोलीस ठाण्यास पत्र लिहून वारंवार हटवूनही पुन्हा जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या २६ जणांविरुद्ध तक्रारही केली आहे. त्यानंतर या झोपडय़ा हटविण्यात आल्या. मात्र आता पुन्हा त्यांनी जागा अडवली आहे. हा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न शासनाने कठोर कारवाई करून हाणून पाडावा, अशी अपेक्षा मनसेने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. शनिवारी संध्याकाळी मनसे आमदार शिशिर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या भूखंडावर कब्जा करू पाहणाऱ्यांना या भागातून हुसकावून लावले. त्याच्या निषेधार्थ झोपडपट्टीतील महिलांनी नवघर पोलीस ठाण्यावर संध्याकाळी मोर्चा नेला. आता रविवारी झोपडपट्टीवासीयांच्या आक्रमणाविरोधात स्थानिक रहिवासी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा