राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) उड्डाणपुलाखाली ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चे बेकायदा देण्यात आलेले ठेके रद्द करण्यात आल्यानंतरही त्या ठिकाणी गाडय़ा पार्क केल्या जात आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी ठेकेदारांनी गुंड टोळ्यांची मदत घेतली आहे. त्यामुळे हतबल झालेल्या एमएसआरडीसीने हे उड्डाणपुल रिकामे करण्यासाठी पोलिसांना साकडे घातले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील उड्डाणपुलाखाली कोणत्याही प्रकारचे पार्किंग न करण्याचा निर्णय राज्य सरकारने २००८ मध्ये घेतला. मात्र एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी परस्पर गोरेगाव, कुर्ला, घाटकोपर, वाकोला, जोगेश्वरी, विक्रोळी, कॅडबरी जंक्शन आदी १२ उड्डाणपुलाखाली ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ सुरू करण्याचे ठेके दिले.  हे ठेके वर्षभरापूर्वी रद्द करण्यात आले.
तरीही ठेकेदारांनी गुंड टोळ्यांमार्फत वाहनतळ सुरूच ठेवले आहेत. एमएसआरडीसीने काही ठिकाणी जबरदस्तीने हे पार्किंग बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी उभारलेले गेटही तोडून टाकण्यात आले असून अधिकाऱ्यांनाही दमबाजी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर अखेरचा पर्याय म्हणून एमएसआरडीसीने पोलिसांना साकडे घातले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री( सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, पोलिसांच्या मदतीने हे वाहनतळ हटवण्यात येतील. तसेच संबंधित ठेकेदारांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

Story img Loader