आसाममधून शस्त्रे घेऊन आलेल्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी शाखेने अटक केली. त्यांच्याकडून १२ बोअरच्या ५ रायफली जप्त केल्या आहेत. ही शस्त्रे बनावट परवाना बनवून ते मुंबई व अन्यत्र विकत होते.
दोन जण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वडाळा येथे सापळा लावून पोलिसांनी याकूब अली रौफ (४६) आणि जमाल हुसेन आमिर हुसेन (३६) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १२ बोअरिंगच्या ५ रायफली, १७ जिवंत काडतुसे,  मोबाईल फोन, बनावट परवाने आणि ते परवाने बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. हे दोन्ही आरोपी मूळ आसामचे आहेत. ते जम्मू-काश्मीरमधून रायफली आणत असत. बोगस परवाने बनवून ते मुंबईसह अन्य राज्यांत २५ ते ३५ हजार रुपयांना विकत. या दोन्ही आरोपींना १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.