सोनिमोहा गावातील निरक्षर पालकांची मुलांच्या आधुनिक शिक्षणासाठी पदरमोड
वर्षांतील सहा महिने घरदार सोडून आपल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी गावोगाव भटकण्याचे आणि अपार श्रम असलेले जिणे आपल्या मुलांच्या वाटय़ाला येऊ नये, त्यांचे भविष्य फुलावे, त्यांना उच्च दर्जाचे अत्याधुनिक शिक्षण मिळावे असे स्वप्न दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्य़ातील ऊसतोडणी कामगारांनी पाहिले, आणि त्यासाठी लगोलग घामाच्या कमाईतून निधीही उभारला. मुलांच्या शिक्षणाविषयीची प्रबळ इच्छा वास्तवात आणण्यासाठी ऊसतोडणी कामगारांनी पदरमोड करून उभ्या केलेल्या निधीतून आता जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांसाठी डिजिटल वर्ग सुरू होत आहे. बीड जिल्ह्य़ातील सोनिमोहा या ऊसतोड मजुरांच्या गावात ही आगळीवेगळी शैक्षणिक क्रांती आकार घेत आहे.
बीड हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दर वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी असे सहा महिने या जिल्ह्य़ातील सुमारे साडेचार लाख मजूर पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये ऊसतोडीसाठी जातात. या जिल्ह्य़ातील सोनिमोहा हे ऊसतोड कामगारांचे गाव आहे.
या मजुरांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. गेल्या वर्षांपासून पालकांच्या आग्रहामुळे व गटशिक्षण अधिकारी डॉ. मेंढेकर यांच्या पुढाकाराने या शाळेत पहिलीपासून सेमी इंग्रजीचे व ज्ञानरचनावादी वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे.
शाळेतील शिक्षकांनी यंदा पहिली उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या पालकांची ३ मे रोजी सभा घेतली. या सभेत दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नियोजनावर व मुलांना प्राथमिक शाळेपासूनच आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल वर्ग सुरू करण्यावर चर्चा झाली. आता त्यासाठी मुलांना मोबाइल टॅब्लेट लागणार. त्याच्या खर्चावरही चर्चा झाली. आणि काही क्षणांतच त्या मजूर पालकांनी वर्गणी काढून जागीच ५६ हजार रुपये शिक्षकांच्या हातात दिले! तीन-चार दिवसांत आणखी ३०-३५ हजार रुपये देऊ, पण आमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मजूरवर्गामधली शिक्षणाबद्दलची ही आस्था बघून शिक्षक भारावून गेले. आता त्यांनीही पुढाकार घेऊन सोनिमोहा या ऊसतोड मजुरांच्या गावात त्यांच्या मुलांसाठी पहिला डिजिटल वर्ग सुरू करण्याचे ठरविले आहे. शिक्षकांनी ही माहिती शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांना मोबाइलवरून दिली. नंदकुमार यांनीही पालक आणि शिक्षकांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
सोनिमोहा गावातील पुढची पिढी तरी हातावर पोट घेऊन ऊसतोडणीसाठी गावोगाव भटकणार नाही, असे स्वप्न यामुळे गावकऱ्यांच्या मनात फुलू लागले आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा