‘आस्तनीतील निखारे मला पक्षात नको, माझे नेतृत्व मान्य आहे त्यांनीच पक्षात राहावे’ या शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली कठोर भूमिका आणि पक्षाच्या साऱ्याच नेत्यांनी बैठकीत लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शुक्रवारी पक्षनेतृत्वासमोर सपशेल लोटांगण घातले. उद्धव ठाकरे यांचा अवमान होईल, असे कोणतेही विधान माझ्याकडून झाले असल्यास पक्षशिस्त म्हणून मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो, असा लेखीनामाच मनोहरपंतांनी प्रसिद्ध केला.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळत नसल्याचे चित्र दिसताच अस्वस्थ मनोहर जोशी यांनी नवरात्रौत्सवातील एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून उद्धव ठाकरे यांना ‘लक्ष्य’ केले होते. यावरून दसरा मेळाव्यात जोशी यांचे ‘अपमान नाटय़’ही घडले होते.  या सर्व पाश्र्वभूमीवर शुक्रवारी ‘मातोश्री’ येथे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली. ‘आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा’ हा बैठकीचा उद्देश होता. मात्र, बैठकीत उद्धव यांनी जोशींनाच ‘लक्ष्य’ केले.
‘शिवसेनेत बंडखोरी वा नाराजी खपवून घेणार नाही. ज्यांना पक्षात राहायचे त्यांनीच राहावे,’ असे त्यांनी बजावले.
हे सारे मनोहर जोशींनाच उद्देशून होते. या इशारेबाजीनंतर शिवसेना नेत्यांनाही जोर आला आणि प्रत्येकाने जोशी यांना जाब विचारला. शिवसेनेत आतापर्यंत कधीही प्रमुखांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेले नाही वा टीकाटिप्पणी करण्यात आलेली नाही, असे एका नेत्याने निदर्शनास आणून दिले. हा सगळा माहोल पाहून मनोहरपंतांनी मवाळ भूमिका घेतली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर माझी निष्ठा आहे. त्याचे पालन ४५ वर्षे केले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावरून केलेले वक्तव्य हे मला आणि पक्षाला मन:स्ताप देणारा ठरला. हे सर्व गैरसमजातून झाले असून, अनेकदा खुलासे करूनही संभ्रम कायम राहिला. शिवसेना पक्षप्रमुखांचे नेतृत्व व त्यांचा आदेश माझ्यासाठी नेहमीच शिरसावंद्य आहे. पक्षप्रमुखांचा अवमान होईल, असे कोणतेही विधान माझ्याकडून अनवधनाने जरी झाले असेल तरी पक्षशिस्त म्हणून झाल्याप्रकाराबद्दल मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो व या वादावर आता तरी पडदा पडेल अशी अपेक्षा करतो.

Story img Loader