मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडी वाढत होती. आता मुंबईसह राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन वातावरणातील गारवा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमान १५ ते २० अंश आणि राज्यातील बहुतांश भागातील तापमान १० अंशाहून अधिक राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
हेही वाचा >>> मुंबईः बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ३३ लाख रुपये उकळले
मुंबईमधील यंदा थंडीच्या हंगामातील किमान तापमान रविवारी १३.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यानंतर गेले दोन दिवस किमान तापमान १५ अंशादरम्यान आहे. तर, आता बुधवारपासून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी सौम्य गारवा आणि दुपारच्या वेळी सौम्य उन्हाचे चटके बसणार आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव आता कमी होणार असल्याने राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार आहे. राज्यातील काही ठिकाणीच गारठा जाणवणार आहे. तर, १८ आणि २० जानेवारी रोजी पश्चिमी झंझावात येणार असल्याने पुन्हा वातावरणात बदल होणार आहे. २० जानेवारीला येणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे वातावरणात बऱ्यापैकी बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली.