मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात पाऊस कोसळत होता. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पहाटे पावसाचा जोर वाढला होता. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरातही पाऊस कोसळत होता. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढचे दोन – तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीस उच्च न्यायालयाचा नकार; सीबीआयची विरोध करणारी याचिका योग्य ठरवली

मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत बुधवारी दमदार हजेरी लावून हाहाकार उडवला. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते .रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रुळांवर पाणी साचल्याने लोकलची एका मागोमाग एक रांग लागली होती. काही प्रवासी लोकलमध्ये, तर काही रेल्वे स्थानकांवर अडकले होते.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक; अनेक लोकल रद्द, तर काहींच्या वेळेत बदल

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे मुंबईतील उकाडा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, विजांचा कडकडाट हे परतीच्या पावसाचे लक्षण असले तरी परतीचा पाऊस सर्वदूर पडत नाही. तसेच राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सध्या पडणारा पाऊस परतीचा नाही. मात्र, ही स्थिती कायम राहणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून मंगळवारी मोसमी वारे परतले आहेत. मात्र, मागील दोन दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर होते. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून उत्तर बांगलादेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. मुंबईबरोबरच सर्वत्र राज्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत होता. मात्र शनिवारपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd forcast mumbai city expects light drizzles mumbai print news zws