मुंबई : संध्याकाळी पडणारा पाऊस आणि दिवसभर ऊन यामुळे जाणवणाऱ्या उकाड्याने मुंबईकर बेजार झाले आहेत. सांताक्रुझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवेत वाढलेला उष्मा आणि आर्द्रता यामुळे उकाडा अधिक तापदायक ठरत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पारा असाच चढा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रांत सोमवारी ३३.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवरील तापमान रविवारपेक्षा एक अंशाने अधिक नोंदले गेले. पुढील दोन दिवस तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसानंतर उन्हाची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
हेही वाचा >>> मुंबई: वेतन प्रलंबित ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द, आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता
सध्या किमान तापमान सरासरीच्या असपास आहे. पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यत्त करण्यात आला आहे. मुंबई, पालघर जिल्ह्यात मंगळवारी हलक्या पावसाचा तर ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. गुरुवारपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरेल. बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी ‘दाना’ या चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. चक्रीवादळ गुरुवार, शुक्रवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ सरकेल. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
दिवाळीत दिलासा
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहात आहेत. मोसमी वारे परतल्यामुळे तापमानातही वाढ होऊ लागली आहे. या दोन्हींचा प्रभाव म्हणून राज्याच्या अनेक ठिकाणी दुपारनंतर अगदी रात्रीपर्यंत उंच ढगांची निर्मिती होऊन विजांसह पाऊस हजेरी लावत आहे. ही स्थिती पुढचे काही दिवसच राहणार असून त्यानंतर हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत पाऊस पडणार नसल्याचे दिलासादायक वृत्त हवमान विभागाने दिले आहे.