मुंबई : मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. परिणामी, मुंबईकरांना थंडीची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा >>> मालाडमधील शाळेत चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणात आर्द्रता जाणवेल, त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव आणखी काही दिवस तरी मुंबईकरांना घेता येणार नाही.पश्चिमी प्रकोप प्रणालीची निर्मिती होत असल्यामुळे वातावरण बदल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरी किमान तापमान २.५ आणि ३ अंशांनी अधिक होते. दरम्यान, वातावरण बदल होत असल्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन कमाल तापमानात घट होऊ शकते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.१ कमाल तापमान नोंदले गेले. कुलाबा येथील तापमानात २४ तासांत १.२ अंशानी वाढ झाली. या तापमानात दोन दिवसांत घट होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.