मुंबई : दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण आहे. दरम्यान, मुंबईत पुढील दोन – तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण जून महिना मुंबईत पावसाचा लपंडाव सुरू होता. जूनअखेरीस पावसाने जोर धरला. मुंबईत सोमवारी पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीला प्रतिसाद, दोन दिवसात २० हजारांहून अधिक अर्ज

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ९ मिलिमीटर, तर सांताक्रूझ केंद्रात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरल्याने सांताक्रूझ केंद्रात कमाल तापमान रविवारच्या तुलनेत सोमवारी २.३ अंश सेल्सिअसने अधिक म्हणजे ३३.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. मात्र, राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबईसह इतर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicts moderate showers in mumbai for the next two to three days mumbai print news zws