मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झदरम्यान आकाराला येत असलेल्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पासाठी आरे परिसरातच कारशेड उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा वापर करून बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रकरणी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
राज्य सरकारच्या आरेमध्ये कारशेड उभारण्याच्या निर्णयाविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता आरेतील पिकनिक पॉइंट येथे पर्यावरणप्रेमी, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था, राजकीय पक्षांनी निदर्शने केली. यावेळी आदित्य ठाकरेही आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याची तक्रार ‘सह्याद्री राइट फोरम’ने केली आहे.