मुंबई : बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटिशीविरोधात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा अपिलीय न्यायाधिकरणाकडे दाद मागत नाहीत. तसेच त्यांनी केलेल्या अपिलावर निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत त्यांच्या घर आणि फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करणार नाही, अशी हमी ईडीने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. ईडीच्या या हमीनंतर न्यायालयाने शिल्पा आणि तिच्या पतीची याचिका निकाली काढली.

लवादासमोरील अपील याचिकाकर्त्यांच्या विरोधात गेल्यास त्या निर्णयाला दोन आठवड्यांची स्थगिती असेल. तसेच, निर्णयाविरोधात शिल्पा आणि राज यांना पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा राहील, असेही न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने दाम्पत्याला दिलासा देताना नमूद केले.

हेही वाचा – Worli Assembly constituency : बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंसाठी अवघड पेपर? महायुतीकडून सुरंग लावण्याचा प्रयत्न, मनसे व शिंदेंनी समीकरणं बदलली

हेही वाचा – Video: …अन् रतन टाटा यांच्या पार्थिवाजवळ जाऊन बसला त्यांचा पाळीव श्वान, शांतनूने सांभाळलं; पाहा व्हिडीओ

तत्पूर्वी, याचिकाकर्त्यांकडे संबंधित न्यायाधिकरणाकडे पहिल्या नोटिशीविरोधात दाद मागण्याचे कायदेशीर पर्याय उपलब्ध होते. परंतु, त्यांना त्या पर्याय वापरू देण्यापूर्वीच त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची नोटीस बजावलीच कशी? अशी विचारणा न्यायालयाने बुधवारच्या सुनावणीवेळी ईडीकडे केली होती. तसेच, प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठेवताना ईडीला या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी शिल्पा आणि राज हे संबंधित न्यायाधिकरणाकडे दाद मागू शकतात. तसेच, त्यांनी केलेल्या अपिलावर निर्णय येईपर्यंत त्यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करणार नसल्याची हमी ईडीने न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने शिल्पा आणि राज यांची याचिका निकाली काढून त्यांना दिलासा दिला.