मुंबई : दिवाळी संपल्यानंतर लगेचच आता निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला आहे. बहुतांश उमेदवारांनी आपली प्रचार कार्यालये सुरु केली असून घरोघरी प्रचाराला आता सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता रंगात आला आहे. दिवाळीपूर्वी उमेदवारी अर्ज भरून झाल्यामुळे आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आपल्यासमोर कोणाचे आव्हान आहे हे उमेदवारांना स्पष्ट झाले असून आता खऱ्या अर्थाने निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर गेले चार-पाच दिवस दिवाळीचा सण असल्यामुळे घरोघरी प्रचाराला सुरुवात झाली नव्हती. दिवाळीच्या दिवसांमध्ये वसाहतीमधल्या पूजा, समारंभाना उमेदवारांनी उपस्थिती लावली आणि प्रचाराचा सुरुवात केली. मात्र आता दिवाळी संपल्यानंतर सोमवारपासून घरोघरी प्रचाराला वेग आला आहे. तर बहुतांश उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी समाजमाध्यमांवरही समूह गट सुरु केले आहेत.
हेही वाचा…सेन्सेक्सची मोठी आपटी! निफ्टी २४ हजारांखाली, अमेरिकेतील राजकीय अनिश्चिततेचा परिणाम
u
अनेक उमेदवारांनी सोमवारी आपले निवडणूक प्रचार कार्यालय सुरु केले. जोगेश्वरी पूर्वच्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवार मनीषा वायकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन झाले. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवार अनंत नर यांच्याही कार्यालयाचे, वरळीतील महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या निवडणूक कार्यालयाचे आणि दिंडोशी मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार संजय निरूपम यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाट्नही सोमवारी करण्यात आले. वरळी मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी सोमवारी लोअर परळ परिसरातील इमारतीत घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली. तर विद्यामान आमदार आदित्य ठाकरे यांचाही कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी मशाल निशाणी हे घरोघरी पोहोचवणे हे ठाकरे सेनेपुढचे मुख्य आव्हान आहे. शिवडी मतदार संघात देखील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचाराचे पत्रक वाटली.
कांदिवली पूर्व विधानसभेचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी प्रचाररथ तयार केला असून सोमवारी त्यांनी आकुर्ली रोड, चाणक्य नगर, अशोक नगर, दामोदर वाडी, सहकार ग्राम, सीपी रोड ते कांदिवली स्थानक भागात प्रचार केला.
हेही वाचा…बंडखोरीमुळे बहुरंगी लढती; महायुती, मविआची डोकेदुखी कायम
अमित ठाकरे यांच्या प्रचाराला सुरुवात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक असून सोमवारी त्यांचाही प्रचार सुरु झाला. सोमवारी एकनाथबुवा हातिसकर मार्ग परिसरात नरिमन भाट नगर येथून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. मनसेने देखील घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.